पुढारी ऑनलाईन डेस्क
लेबनॉन येथील दहशतवादी गट हिजबुल्लाह (Hezbollah) आणि इस्रायल (Israel Hezbollah Conflict) या दोघांची एकमेकांविरुद्ध मोठ्या प्रमाणावर लष्करी कारवाई सुरु आहे. यामुळे मध्य पूर्वेत तणाव वाढला आहे. इराण समर्थित गट हिजबुल्लाहच्या एका निवेदनानुसार, "त्यांनी ३२० हून अधिक कात्युशा रॉकेट डागली आहेत. या रॉकेट्सनी प्रमुख इस्रायली लष्करी ठिकाणांना टार्गेट केले. या हल्ल्याला इस्रायली सैन्यानेही चोख प्रत्युत्तर देत लेबनॉनमधील टार्गेंट्सवर हल्ले सुरू केलेत.
इस्रायली- व्याप्त गोलान हाइट्समधील मजदल शम्स शहरावर गेल्या महिन्यात लेबनॉनमधून प्राणघातक रॉकेट हल्ला करण्यात आला होता. त्यानंतर इस्रायलने प्रत्युत्तरादाखल केलेल्या हल्ल्यात दक्षिण बेरूतमधील हिजबुल्लाहचा सर्वोच्च कमांडर ठार झाला होता.
दरम्यान, हिजबुल्लाहने बदला घेण्याची धमकी दिली होती. या धमकीमुळे सीमेच्या दोन्ही बाजूंनी अनेक उड्डाणे रद्द करण्यात आली. रविवारी सकाळी हिजबुल्लाहने सांगितले की, त्यांनी शेकडो ड्रोन्स आणि सोव्हिएत काळातील शॉर्ट-रेंज प्रोजेक्टाइल रॉकेट्स डागून इस्रायलला चोख प्रत्युत्तर दिले आहे.
इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी दावा केला आहे की, आम्ही हिजबुल्लाहचे ड्रोन हल्ले परतवून लावले. इस्त्रायली अधिकाऱ्यांनी सांगितले की, मोठ्या प्रमाणात हल्ले रोखण्यासाठी त्यांनी रात्रभर हिजबुल्लाहच्या टार्गेट्सवर हल्ला केला आणि त्यांनी लेबनॉनमधील अनेक रॉकेट लाँचरला टार्गेट केले. रविवारी सकाळी जेट विमानांनी हिजबुल्लाहचे हजारो रॉकेट लाँचर नष्ट केले, असे इस्रायलच्या सैन्याने म्हटले आहे.
लेबनॉन आरोग्य मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, इस्रायली हल्ल्यांमध्ये ३ लोक ठार झाले. हिजबुल्लाह आणि इस्रायल यांच्यातील ११ महिन्यांच्या शत्रुत्वानंतर रविवारी सकाळी संघर्ष सुरु झाला होता.