

पुढारी ऑनलाईन डेस्क : इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी मंगळवारी (दि.26) एक मोठी घोषणा केली. नेतान्याहू यांनी हिजबुल्लासोबत युद्धविराम जाहीर केला आहे. यासोबतच इस्त्रायलच्या पंतप्रधानांनी सांगितले की, ते कोणत्या परिस्थितीत हा करार करत आहेत, तसेच कोणत्या परिस्थितीत इस्रायल पुन्हा लेबनॉनवर हल्ला करू शकते याचे देखील स्पष्टीकरण देखील दिले आहे. या पुढे बोलताना नेतान्याहू म्हणाले, "आम्ही लेबनॉनशी करार करण्यास तयार आहेत, पण जर कोणत्याही प्रकारचे उल्लंघन झाले तर ते. जोरदार प्रत्युत्तर देईल. ते संध्याकाळी त्यांच्या संपूर्ण मंत्रिमंडळासमोर युद्धविराम करार सादर करतील."
नेतान्याहू म्हणाले, ही युद्धविराम किती काळ टिकेल, हे लेबनॉनमध्ये काय होते यावर अवलंबून आहे. हिजबुल्लाहने युद्धविराम कराराचे उल्लंघन केल्यास आम्ही हल्ला करू. जर हिजबुल्लाने सीमेजवळ दहशतवादी कारवाया केल्या तरीही आम्ही हल्ला करू. नेतान्याहू पुढे म्हणाले, हिजबुल्लाहने रॉकेट सोडले तर आम्ही प्रत्युत्तर देण्यास मागे हटणार नाही.
यावेळी पीएम नेतन्याहू यांनी युद्धविराम का असावा हे स्पष्ट केले. यामागे तीन कारणे सांगितली आहेत.
इराणवर लक्ष केंद्रित करण्यासाठी हा निर्णय घेतला आहे.
इस्त्रायली सैन्याला विश्रांती देण्यासाठी तसेच संपलेला शस्त्रसाठा पुन्हा भरण्यात येणार आहे.
नेतन्याहू यांच्यासाठी तिसरे आणि महत्त्वाचे कारण म्हणजे हमास. नेतान्याहू म्हणाले, इराण आणि हिजबुल्लाह हमासला युद्धात मदत करत होते, आता युद्धबंदीनंतर हमास एकटा पडेल.
हिजबुल्लाबाबत नेतान्याहू म्हणाले, हमासला पाठिंबा देणारा हिजबुल्लाह आणि इराण हिजबुल्लाहला पाठिंबा देत होता, तो आता पूर्वीपेक्षा खूपच कमकुवत झाला आहे. नेतान्याहू म्हणाले, आम्ही हिजबुल्लाला अनेक दशके मागे ठेवले आहे. त्यातील प्रमुख नेत्यांना आम्ही संपवले आहे. त्यांची क्षेपणास्त्रे आणि रॉकेटही आम्ही नष्ट केले आहेत. आम्ही संपूर्ण लेबनॉनमध्ये धोरणात्मक उद्दिष्टे लक्षित केली आणि बेरूतला त्याच्या केंद्रस्थानी धक्का दिला.
सर्व उद्दिष्टे साध्य होईपर्यंत युद्ध सुरूच राहील, असे नेतान्याहू म्हणाले. जोपर्यंत उत्तर इस्रायलमधील सर्व लोकांना सुरक्षितपणे देशात परत आणले जात नाही. गाझाचा संदर्भ देत इस्रायलचे पंतप्रधान म्हणाले, आम्ही हमासच्या बटालियन नष्ट केल्या आणि 20 हजारांहून अधिक दहशतवाद्यांना ठार केले. आम्ही सिनवारला ठार केले आणि आम्ही हमासच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना संपवले. नेतान्याहू म्हणाले की, आम्ही आमच्या 154 कैद्यांना देशात परत आणले आहे. आमच्याकडे सध्या गाझामध्ये 101 कैदी आहेत, ज्यांना आम्ही सुरक्षितपणे आणू.
हिजबुल्लाह आणि इस्रायलमध्ये गेल्या एक वर्षापासून युद्ध सुरू आहे. लेबनॉनचे म्हणणे आहे की, युद्धात किमान 3,768 लोक मारले गेले आहेत, त्यापैकी बहुतेक गेल्या दोन महिन्यांत मरण पावले आहेत. दुसरीकडे इस्रायलचे म्हणणे आहे की, हिजबुल्लाहच्या हल्ल्यात आतापर्यंत 82 सैनिक आणि 47 नागरिक मारले गेले आहेत. दुसरीकडे, इस्रायल आणि हमासमध्ये सुरू असलेल्या युद्धात संपूर्ण गाझा उद्ध्वस्त झाला आहे, गाझा आरोग्य मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, या युद्धात 44 हजार लोकांचा मृत्यू झाला आहे, तर अनेक जण जखमी झाले आहेत.