.jpg?w=480&auto=format%2Ccompress&fit=max)
.jpg?w=480&auto=format%2Ccompress&fit=max)
राजकीय समाजशास्त्राच्या द़ृष्टीने विचार केल्यास असे दिसते की, इस्रायली राजकारण व समाजकारण आता भावनिक बनले आहे. 10 तासांचा संप व 8 शहरांतील निदर्शने त्याचे द्योतक आहे. नेतान्याहू यांनी लोकमानस समजून घेतले पाहिजे. युद्ध व तणावाऐवजी शांतता व सहकार्य, विकास व पुनर्रचना हा मार्ग अनुसरला, तर ते चक्रव्यूहातून बाहेर पडतील आणि इस्रायल व पॅलेस्टाईनलाही विकासाचा मार्ग दिसू शकेल.
एकेकाळी छळाकडून बळाकडे प्रवास केलेल्या इस्रायलला आता अनेक संकटांशी सामना करावा लागत आहे. गतवर्षी 7 ऑक्टोबर रोजी मध्यरात्री इस्रायलच्या राजधानीवर झालेला हमास संघटनेचा हल्ला अनेक समस्यांचे दुष्टचक्र निर्माण करणारा ठरला. चोख प्रत्युत्तर म्हणून इस्रायलने हमासवर कारवाई केली. त्याचा हेतू हमासला धडा देणे आणि ओलिस ठेवलेल्या नागरिकांची मुक्तता करणे हा होता; पण अजूनही ओलिसांची मुक्तता झालेली नाही. 9 ऑक्टोबरच्या हल्ल्यानंतर 250 लोकांना हमासने ओलिस ठेवले होते. पैकी 150 जणांची सुटका मागच्या नोव्हेंबरमध्ये झाली. त्या बदल्यात इस्रायलने एक हजार हमासच्या ओलिसांची सुटका केली होती. अजूनही 100 इस्रायली हमासच्या ताब्यात ओलिस म्हणून आहेत. जवळजवळ 11 महिने झाले, तरी युद्ध थांबत नाही. त्यामुळे लोक नाराज आहेत. मागील आठवड्यात गाझामध्ये हमासने ओलिस ठेवलेल्या 6 नागरिकांचे मृतदेह सोपविल्यानंतर इस्रायलमध्ये लोकांचा क्षोभ अनावर झाला. देशात 5 लाख लोक रस्त्यावर आले आणि त्यांनी 10 तास आंदोलन केले. या लोकक्षोभाचा अर्थ काय? इस्रायलमधील जनता पंतप्रधान नेतान्याहू यांच्या विरोधात इतक्या टोकाची भूमिका का घेत आहे? त्यांची लोकप्रियता का घसरत आहे, या सर्व प्रश्नांची मीमांसा केली असता त्यामागील सामाजिक मानसशास्त्र व राजकीय समाजशास्त्र समजून घेणे अगत्याचे आहे.
नेतान्याहू यांच्यावर इस्रायलच्या जनतेची माफी मागण्याची वेळ आली. असे का झाले? नेतान्याहू एवढ्या लोकप्रियतेच्या शिखरावर असताना ते आता कोंडीत का सापडले आहेत? पुढेही जाता येत नाही आणि मागेही जाता येत नाही अशा विचित्र संक्रमण अवस्थेतून त्यांना वाटचाल करावी लागत आहे. जेव्हा अस्तित्वाचे सर्व मार्ग खुंटतात आणि संघर्ष वा युद्ध प्रश्नाचे उत्तर देऊ शकत नाही, तेव्हा राजकीय नेत्यांना माफीशिवाय दुसरा मार्ग उरत नाही. कुठल्याही हुकूमशहाची हीच गत असते. नेतान्याहू यांनी इस्रायलमधील जनतेचा क्षोभ लक्षात घेऊन, सरळ लोकांचे पाय धरले आणि जनता जनार्दनापुढे अखेर लोटांगण घातले. हमासने ओलिस ठेवलेल्या नागरिकांची सुटका करण्यात त्यांना अपयश आले. त्याचा त्यांना पश्चात्ताप झाला व त्यांना जनतेच्या न्यायालयात माफीच्या पिंजर्यात उभे राहावे लागले आहे. गत महिन्यात ओलिसांचे मृतदेह गाझामध्ये समोर आल्यानंतर प्रकट झालेला लोकक्षोभ हा इस्रायली जनतेचा आक्रोश म्हटला पाहिजे. एकीकडे ओलिसांच्या सुटकेचे अपयश आणि दुसरीकडे युद्धबंदी करण्यात येणार्या अडचणी अशा दुहेरी संकटात नेतान्याहू सापडले आहेत. वेळीच युद्धबंदी झाली नाही, तर उरलेल्या ओलिसांचेही मृतदेह पाठविण्यात येतील, असा इशारा हमासने दिला आहे. हमास एकाप्रकारे इस्रायल व नेतान्याहू यांची कोंडी करण्याचा प्रयत्न करीत आहे. राजकीय तडजोडी किंवा त्रिपक्षीय वाटाघाटीचा मार्ग खुला होता, रास्त होता; पण नेतान्याहू यांनी सहकार्य व संघर्ष असे दुटप्पी धोरण अनुसरले. त्यांनी तिकडे शांततेची बोलणी सुरू असताना इराणमध्ये हमासच्या म्होरक्याची हत्या करविली आणि ते ‘इकडे आड तिकडे विहीर’ अशा विचित्र संकटात सापडले.
इस्रायल-हमासमध्ये युद्धविराम व्हावा, शांतता निर्माण व्हावी म्हणून त्रिपक्षीय पातळीवर प्रयत्न करण्यात आले. इजिप्त, कतार, सौदी अरेबिया तसेच अमेरिका हे युद्धबंदीसाठी प्रयत्न करीत आहेत. कतारची राजधानी दोहा येथे बोलण्याच्या अनेक फेर्या झाल्या; पण या चर्चेच्या गुर्हाळातून निष्पत्ती मात्र लवकर निघाली नाही. चर्चेला पूर्णविराम कोण व कसा देणार, याकडे जगाचे लक्ष लागले होते; परंतु नेतान्याहू यांचा अडमुठेपणा आणि हमासचा दुराग्रह या गोष्टींमुळे युद्धबंदी सतत लांबत आहे. त्याचे दुष्परिणाम दोघांनाही भोगावे लागत आहेत. दुहेरी संकटात सापडलेल्या नेतान्याहूंवर टीकेचा भडिमार होत आहे आणि त्यांना आता कठोर आत्मपरीक्षण करण्याची वेळ आली आहे. इस्रायलमधील लेबर कोर्टाने कामगारांना संप मागे घेण्याची विनंती केली, तरीही कामगारांनी सरकारला वाटाण्याच्या अक्षता दाखविल्या आणि आंदोलन सुरू ठेवले. या निदर्शनाचे एवढे व्यापक स्वरूप का झाले? त्याचे कारण असे की, तेथील सर्वात मोठ्या कामगार संघटनेने या संपाची हाक दिली होती व त्याला लोकांनी चांगला प्रतिसाद दिला. 2 सप्टेंबर रोजी संपाच्या तीव—तेमुळे बेन गुरियन विमानतळावरील अनेक उड्डाणे रद्द करण्यात आली. रस्त्यावरील शुकशुकाट, लोकांची घोषणाबाजी, हातात पोस्टर व व्यंगचित्रे घेऊन नेतान्याहूंना वाकुल्या दाखविण्याचा प्रकार झाला. यावरून आंदोलन किती खोलवर पसरले याची कल्पना येते. हे युद्ध लांबले, तर इस्रायलमधील शांतता बिघडेल, लोकजीवन अस्वस्थ होईल आणि लोकांच्या जीवनातील शांतता व स्थैर्य नाहीसे होईल. म्हणून लोकांना युद्ध नको आहे. शांतता हवी आहे; पण नेतान्याहू मात्र इतिहासात आपली नोंद एक पराक्रमी व विजयी नेता अशी व्हावी आणि हमासचा पराभव मीच केला व संपूर्णपणे काटा काढला. गाझापट्टीवर पूर्ण विजय मिळविला. हिजबुुल्लालाही आपण वठणीवर आणले, अशा स्वरूपाची इतिहासात नोंद करण्यासाठी नेतान्याहू हापापलेले आहेत. त्यांचा हा हट्ट इस्रायलच्या जनतेवर मात्र विपरीत परिणाम करीत आहे.