

पुढारी ऑनलाईन डेस्क : Israel Hamas War | आज सकाळी इस्रायली हवाई हल्ल्यात किमान ३३० लोक ठार झाल्याचे गाझाच्या आरोग्य मंत्रालयाने म्हटले आहे. युद्धबंदीनंतर गाझामध्ये झालेला हा सर्वात मोठा हल्ला आहे. ज्यामध्ये इतके लोक मृत्युमुखी पडले आहेत. दरम्यान, हमासने इशारा दिला आहे की गाझामध्ये इस्रायलचे नवीन हल्ले युद्धबंदीचे उल्लंघन आहेत आणि त्यामुळे ओलिसांचे जीवन धोक्यात येऊ शकते.
पॅलेस्टिनी अधिकाऱ्यांनी हल्ल्यात सुमारे ३३० लोकांचा मृत्यू झाल्याची माहिती दिली आहे. जानेवारीत युद्धविराम लागू झाल्यापासून हा गाझामधील सर्वात विध्वंसक हल्ला आहे. दुसरीकडे, इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी सांगितले की, युद्धविराम वाढवण्यासाठी सुरू असलेल्या चर्चेमध्ये विशेष प्रगती न झाल्याने त्यांनी हल्ल्याचा आदेश दिला. नेतान्याहू यांच्या कार्यालयाने म्हटले आहे की, इस्रायल आता आपली लष्करी ताकद वाढवून हमासविरोधात कारवाई करेल.
इस्रायलने या हवाई हल्ल्याचे कारण हमासने सातत्याने बंदिवानांची सुटका करण्यास नकार देणे असल्याचे सांगितले आहे. इस्रायलने हमासच्या दहशतवाद्यांवर हवाई हल्ले केल्याचा दावा केला आहे. इस्रायलच्या हल्ल्यानंतर गाझा पट्टीतील शाळा बंद करण्यात आल्या. हमासने इस्रायलवर युद्धविरामाच्या उल्लंघनाचा आरोप केला असून, नेतान्याहू आणि त्यांच्या सरकारने युद्धविरामाचा भंग केल्यामुळे बंदिवानांच्या भविष्यासंबंधी अनिश्चितता निर्माण झाल्याचे म्हटले आहे.