बगदाद : इराकच्या न्याय मंत्रालयाने वैयक्तिक कायद्यात सुधारणा करण्याच्या नावाखाली मुलींचे लग्नाचे वय १८ वरून ९ वर्षे करणारा नवीन कायदा आणण्याची तयारी सुरू केली आहे. यावरून जगभर इराकवर टीका करण्यात येत असून मानवाधिकार व स्त्री हक्क संघटना आवाज उठवत आहेत.
इराकच्या न्याय मंत्रालयाने हे विधेयक संसदेत आणले असून त्यातील तरतुदींमुळे ते येण्याआधीच वादग्रस्त ठरले आहे. या नवीन कायद्यानुसार नागरिकांना त्यांचे कौटुंबिक विषय हाताळण्यासाठी नागरी न्यायालये अथवा धार्मिक संस्था यातून निवड करण्याची मुभा देण्यात आली आहे. त्यामुळे वारसा हक्क, घटस्फोट आणि मुलांचे पालकत्व या बाबतीतील अधिकारांत कपात होण्याची भीती आहे.
याशिवाय आणखी एक धक्कादायक तरतूद ही लग्नाचे वय ठरवण्याची आहे. आतापर्यंत मुलींसाठी १८ तर मुलांसाठी २१ हे लग्नाचे वय निश्चित करण्यात आले होते. आता नवीन कायद्यात मुलींचे लग्नाचे वय ९ तर मुलांचे लग्नाचे वय १५ निश्चित करण्यात येणार आहे. लग्नाच्या वयाच्या या बदलाला आतापासूनच विरोध सुरू झाला आहे. इराकमधील महिलांच्या आरोग्यविषयक काम करणार्या संघटना तसेच जगभरातील महिला हक्क व मानवाधिकार संघटना संतप्त झाल्या असून लग्नाचे वय बदलणे हे बुरसटलेल्या काळात मागे जाण्यासारखे आहे, असे त्यांचे म्हणणे आहे.