US vs Iran | आमचा हल्ला भीषण असेल; इराणचा अमेरिकेला इशारा

तेलवाहू जहाजांवर हल्ल्यांनंतर तणाव वाढला
US vs Iran |
US vs Iran | आमचा हल्ला भीषण असेल; इराणचा अमेरिकेला इशारा
Published on
Updated on

तेहरान/वॉशिंग्टन; वृत्तसंस्था : युद्धाचे नियम बदलले आहेत. उशीर होण्यापूर्वी अमेरिकेने हे समजून घ्यावे. अमेरिकेने इराणी हितसंबंधांवर किंवा सुरक्षेवर यापुढे कोणताही हल्ला केल्यास त्याला अधिक वेगवान, तीव्र आणि वेदनादायी प्रत्युत्तर दिले जाईल, आमचा हल्ला भीषण असेल, असा इशारा इराणच्या संसदेचे अध्यक्ष मोहम्मद गालिबाफ यांनी रविवारी अमेरिकेला दिला. आखाती भागात इराणशी संबंधित तेलवाहू जहाजांवर अमेरिकेने हल्ले केल्यानंतर गालिबाफ यांनी टेलिग्राम चॅनेलवर आपल्या भाषणातून हा इशारा दिला आहे.

इराणचे परराष्ट्रमंत्री अब्बास अराघची यांनी सौदी अरेबिया आणि तुर्कीच्या परराष्ट्रमंत्र्यांशी दूरध्वनीवरून चर्चा केली. प्रादेशिक परिस्थिती आणि राजनैतिक प्रयत्नांवर या चर्चेत विचारविनिमय झाल्याचे सांगण्यात आले. अमेरिका आणि इराणमध्ये मागील आठवड्यात पुन्हा लष्करी संघर्ष सुरू झाला. या आठवड्याच्या सुरुवातीला अमेरिकेच्या हल्ल्यात किमान पाच जणांचा मृत्यू झाल्याचे वृत्त आहे.

तेलवाहतुकीवर परिणामाची भीती

होर्मुझची सामुद्रधुनी जगातील महत्त्वाच्या तेलवाहतूक मार्गांपैकी एक असल्याने संघर्ष आणखी वाढल्यास जागतिक तेलपुरवठ्यावर परिणाम होण्याची शक्यता आहे. इराणकडून सातत्याने कठोर इशारे दिले जात असून, संघर्षाचा विस्तार झाल्यास आखाती भागातील सुरक्षा, तेलवाहतूक आणि जागतिक अर्थव्यवस्थेवर त्याचे गंभीर परिणाम होऊ शकतात.

अमेरिकेच्या नौदलाकडून हल्ला

अमेरिकेने इराणशी संबंधित तीन तेलवाहू जहाजांवर कारवाई केल्याचे सांगितले आहे. अमेरिकेच्या सेंट्रल कमांडने या जहाजांचा संबंध इराणशी असल्याचा आरोप केला. नौदलाच्या जहाजांवर क्षेपणास्त्र हल्ल्याचा प्रयत्न झाल्यानंतर ही कारवाई केल्याचे अमेरिकेने म्हटले आहे. दुसरीकडे, इराणच्या रिव्होल्युशनरी गार्डस्‌ने अमेरिकेशी संबंधित जहाजांना लक्ष्य केल्याचा दावा केला आहे. त्यावर अमेरिकेकडून तातडीने प्रतिक्रिया दिलेली नाही.

ड्रोनवर हल्ल्याचा दावा

इराणच्या रिव्होल्युशनरी गार्डस्‌ने अमेरिकन नौदलाच्या एका मानवरहित ड्रोनवरही हल्ला केल्याचा दावा केला. हे वाहन होर्मुझच्या सामुद्रधुनीतील संरक्षित क्षेत्रात प्रवेश करण्याचा प्रयत्न करत होते, असे इराणने म्हटले आहे.

इस्रायल-लेबनॉन सीमाही धुमसली

दरम्यान, हिजबुल्लाहने दक्षिण लेबनॉनमधील इस्रायली सैनिकांवर दोन ड्रोन सोडल्याचा आरोप इस्रायली लष्कराने केला. त्यानंतर इस्रायलने दक्षिण लेबनॉनमध्ये हवाई हल्ले सुरू केले. लेबनॉनच्या आरोग्य मंत्रालयानुसार, रविवारी इस्रायली हल्ल्यांत चारजणांचा मृत्यू झाला असून २० जण जखमी झाले. मृतांमध्ये दोन महिलांचा समावेश आहे. इस्रायलने अरब सलीम परिसरातील नागरिकांना हल्ल्यापूर्वी सुरक्षित ठिकाणी जाण्याचे आवाहन केले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news