

Iran US talks
वॉशिंग्टन : मध्यपूर्वेतील वाढता तणाव पूर्णपणे निवळण्याच्या उद्देशाने अमेरिका आणि इराण यांच्यात अत्यंत सकारात्मक चर्चा सुरू झाली असल्याचे संकेत अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दिले आहेत. तसेच चर्चा पुढे सुरू ठेवता यावी यासाठी इराणचे वीज प्रकल्प आणि ऊर्जा पायाभूत सुविधांवर नियोजित असलेले कोणतेही हल्ले पाच दिवसांसाठी स्थगित करण्याचे आदेश दिल्याचे अमेरिकन नेत्याने सांगितले. युद्ध चौथ्या आठवड्यात प्रवेश करत असताना, तणाव कमी होण्याचे हे पहिले सार्वजनिक संकेत मानले जात आहेत. दरम्यान, इराणकडून अद्याप कोणत्याही अटी स्वीकारल्याचे संकेत मिळालेले नाहीत किंवा औपचारिक चर्चा सुरू असल्याच्या वृत्ताला दुजोराही देण्यात आलेला नाही.
ट्रम्प यांनी त्यांच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरील पोस्टमध्ये म्हटलं आहे की, "मला कळवताना आनंद होत आहे की, गेल्या दोन दिवसांत युनायटेड स्टेट्स आणि इराणमध्ये मध्यपूर्वेतील शत्रुत्व पूर्णपणे संपवण्याबाबत अत्यंत सकारात्मक आणि विधायक चर्चा सुरु झाली आहे. या सखोल आणि सकारात्मक चर्चेचा कल लक्षात घेता, मी संरक्षण विभागाला इराणच्या वीज प्रकल्पांवर आणि ऊर्जा पायाभूत सुविधांवरील सर्व लष्करी हल्ले पाच दिवसांच्या कालावधीसाठी पुढे ढकलण्याचे निर्देश दिले आहेत. मात्र, हे चालू असलेल्या बैठका आणि चर्चेच्या यशावर अवलंबून असेल."
ट्रम्प यांनी यात एक महत्त्वाची अट घातली आहे. हल्ले थांबविण्याबाबत स्थगिती तात्पुरती असून ती पूर्णपणे वाटाघाटींच्या पुढील प्रगतीवर अवलंबून आहे. दुसरीकडे, इराणकडून अद्याप कोणत्याही अटी स्वीकारल्याचे संकेत मिळालेले नाहीत किंवा औपचारिक चर्चा सुरू असल्याच्या वृत्ताला दुजोराही देण्यात आलेला नाही.
अमेरिकेने दिलेल्या अल्टिमेटमला प्रत्युत्तर म्हणून इराणने नवीन आणि स्पष्ट धमक्या दिल्यानंतर काही तासांतच ट्रम्प यांची ही घोषणा आली आहे. सोमवारी, इराणच्या अधिकाऱ्यांनी इशारा दिला होता की, आमच्या भूभागावर पुन्हा हल्ला झाला, तर ते आखाती समुद्रात समुद्री सुरुंग पसरवतील आणि इराणमधील सर्व वीज केंद्रांवर हल्ले करतील. इराणने संभाव्य लक्ष्यांचे नकाशे देखील प्रसिद्ध केले होते. यामध्ये इस्रायलमधील दोन सर्वात मोठे वीज प्रकल्प तसेच सौदी अरेबिया, संयुक्त अरब अमिराती (UAE), कतार आणि कुवेत मधील केंद्रांचा समावेश होता.