

वॉशिंग्टन/तेहरान; वृत्तसंस्था : अमेरिका आणि इस्रायली हल्ल्यात इराणने मोठ्या संख्येने क्षेपणास्त्रे वापरली असली, तरीही त्यांच्याकडे अजूनही हजारो क्षेपणास्त्रे शिल्लक आहेत. अमेरिकन गुप्तचर यंत्रणेच्या अंदाजाचा हवाला देत वॉल स्ट्रीट जर्नलने ही माहिती दिली आहे.
युद्धात इराणच्या क्षेपणास्त्र ताकदीचे मोठे नुकसान नक्कीच झाले आहे. पण ती पूर्णपणे नष्ट झालेली नाहीत; आजही कार्यान्वित आहेत. युद्धापूर्वी इराणकडे सुमारे 2500 मध्यम पल्ल्याची बॅलेस्टिक क्षेपणास्त्रे होती. त्यापैकी 1000 हून अधिक क्षेपणास्त्रे अजूनही त्यांच्याकडे शिल्लक आहेत, असा अंदाज आहे. त्यामुळे युद्धबंदी न झाल्यास त्याचा वापर होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
इराणने पेरलेल्या सुरुंगांमुळे संकट
दरम्यान, अमेरिकन अधिकार्यांनी सांगितले की, इराणला होर्मुझच्या सामुद्रधुनीत पेरलेल्या सर्व सागरी सुरुंगांचा पत्ता लावणे कठीण जात आहे. यामुळे हा महत्त्वाचा सागरी मार्ग पूर्णपणे सुरक्षित करणे आव्हानात्मक बनले आहे. ‘न्यू यॉर्क टाइम्स’ने ही माहिती दिली आहे.
युद्धादरम्यान इराणी सैन्याने होर्मुझमध्ये अनेक सुरुंग पेरले होते. मात्र, आता हे सुरुंग शोधून ते नष्ट करण्यात त्यांना स्वतःलाच अडचणी येत आहेत. याचे मुख्य कारण म्हणजे इराणकडे सुरुंग हटवण्याची मर्यादित क्षमता आहे आणि कोणत्या ठिकाणी किती सुरुंग पेरले गेले, याचा कोणताही स्पष्ट रेकॉर्ड त्यांच्याकडे उपलब्ध नाही.
याचाच अर्थ, या मार्गावरून जहाजांची ये-जा पूर्णपणे सुरक्षित करण्यासाठी अजून बराच वेळ लागू शकतो.
होर्मुझ सुरळीत होण्यासाठी बराच वेळ लागणार
एका अहवालानुसार, होर्मुझमधील जहाजांची एकूण वाहतूक अजूनही पूर्वीसारखी सामान्य झालेली नाही. व्यापारी उलाढाल युद्धापूर्वीच्या पातळीपेक्षा अजूनही खूपच कमी असून, परिस्थिती पूर्णपणे पूर्वपदावर येण्यासाठी आणखी काही वेळ लागेल.
नुकसान झालेले लाँचर्स पुन्हा वापरणे शक्य...
इराणचे निम्म्याहून अधिक लाँचर्स एकतर नष्ट झाले आहेत किंवा ते भूमिगत तळांमध्ये लपवून ठेवण्यात आले आहेत. मात्र, यातील अनेक लाँचर्स दुरुस्त करण्यायोग्य आहेत किंवा डोंगराळ भागातील मजबूत तळांवरून ते पुन्हा वापरले जाऊ शकतात.