America vs Iran | अमेरिकेशी चर्चा सुरू नाही; इराणने ट्रम्प यांचा दावा फेटाळला

होर्मुझबाबत इराणची ओमानशी चर्चा
America vs Iran |
America vs Iran | अमेरिकेशी चर्चा सुरू नाही; इराणने ट्रम्प यांचा दावा फेटाळला
Published on
Updated on

तेहरान/वॉशिंग्टन; वृत्तसंस्था : अमेरिका आणि इराण यांच्यातील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर युद्धाची शक्यता कायम असतानाच दोन्ही देशांकडून परस्परविरोधी दावे आणि कूटनीतिक हालचालींना वेग आला आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणवरील नियोजित मोठा लष्करी हल्ला गल्फ देशांच्या विनंतीवरून स्थगित केल्याचा दावा केला. मात्र, इराणने हा दावा फेटाळून लावत सध्या अमेरिकेसोबत कोणतीही चर्चा सुरू नसल्याचे स्पष्ट केले आहे.

ट्रम्प यांनी सोशल मीडियावरील पोस्टमध्ये इराण आणि काही मध्यपूर्वेतील देशांनी हल्ला टाळण्याची विनंती केल्याचे सांगितले. होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा खुली करण्यासह व्यापक कराराच्या चौकटीवर सहमती झाल्याचा दावाही त्यांनी केला. तसेच इराणच्या अणुकार्यक्रमासंदर्भातील चर्चाही लवकरच सुरू होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली. मात्र, इराणच्या सरकारी माध्यमांनी ट्रम्प यांच्या दाव्याचे खंडन केले. इराणकडून कोणत्याही प्रकारची युद्धविरामाची विनंती केलेली नसल्याचे स्पष्ट करण्यात आले. काही वृत्तसंस्थांनी तर ट्रम्प यांची खिल्ली उडवत, ‘ट्रम्प यांची धमकीची हवा निघून गेली’ अशा शब्दांत प्रतिक्रिया दिली. इराणी लष्कर सतर्क असून कोणत्याही परिस्थितीला सामोरे जाण्यास तयार असल्याचा दावा इराणी अधिकाऱ्यांनी केला.

ओमान किनाऱ्याजवळ टँकरलगत स्फोट

दरम्यान, ओमानच्या किनाऱ्याजवळ एका तेलवाहू जहाजाजवळ स्फोट झाल्याची घटना घडली. ब्रिटनच्या युनायटेड किंगडम मेरीटाईम ट्रेड ऑपरेशन्स या संस्थेने या घटनेला दुजोरा दिला. सुदैवाने जहाजावरील सर्व कर्मचारी सुरक्षित असून स्फोटाच्या कारणाचा तपास सुरू केला आहे. या घटनेनंतर आखाती भागातील जहाजवाहतुकीवर पुन्हा एकदा सावधगिरीचा इशारा देण्यात आला आहे.

आखाती देशांचा हल्ला टाळण्याचा आग्रह

ट्रम्प यांच्या म्हणण्यानुसार, सौदी अरेबिया, कतार आणि संयुक्त अरब अमिरातीसह अनेक गल्फ देशांनी अमेरिकेला इराणवरील नव्या हल्ल्यापासून परावृत्त करण्याचा प्रयत्न केला. सौदीचे युवराज मोहम्मद बिन सलमान यांनी नव्या हल्ल्यामुळे संपूर्ण प्रदेश अस्थिर होईल आणि जागतिक अर्थव्यवस्थेलाही मोठा फटका बसेल, अशी भीती व्यक्त केल्याचे वृत्त आहे. त्यानंतर अमेरिकेने चर्चेला आणखी संधी देण्याचा निर्णय घेतल्याचा दावा ट्रम्प यांनी केला.

इराणमध्ये दोघांना फाशी

या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर इराणने इस्रायलसाठी हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली ओमिद बेहजाद आणि पोरिया सफवत या दोन नागरिकांना सोमवारी फाशी दिली. लष्करी तळांची माहिती, छायाचित्रे आणि संवेदनशील माहिती इस्रायलला पुरवल्याचा त्यांच्यावर आरोप होता. गेल्या काही महिन्यांत राष्ट्रीय सुरक्षेशी संबंधित आरोपांवर इराणमध्ये फाशीच्या शिक्षांमध्ये मोठी वाढ झाली आहे. मानवाधिकार संघटनांच्या माहितीनुसार, गेल्या चार महिन्यांत राष्ट्रीय सुरक्षेच्या आरोपांखाली किमान ५० जणांना फाशी देण्यात आली असून त्यात १८ ते १९ वर्षे वयोगटातील तरुणांचाही समावेश आहे.

होर्मुझबाबत इराण-ओमानमध्ये चर्चा

जगातील सर्वात महत्त्वाच्या तेलवाहतूक मार्गांपैकी एक असलेल्या होर्मुझ सामुद्रधुनीबाबत इराण आणि ओमान यांच्यात सुरक्षित नौवहनासाठी तात्पुरत्या मार्गावर चर्चा सुरू आहे. इराणचे परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते इस्माईल बघाई यांनी दोन्ही देशांमध्ये सकारात्मक चर्चा सुरू असल्याचे सांगितले. तथापि, ओमानशी करार झाला तरी सामुद्रधुनी पूर्णपणे खुली होईल, असे नाही. अमेरिकेचे हल्ले थांबल्याशिवाय पूर्वीप्रमाणे वाहतूक सुरू होणार नसल्याचे इराणने स्पष्ट केले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news