पुढारी ऑनलाईन डेस्क : इराणचे राष्ट्राध्यक्ष इब्राहिम रईसी आणि परराष्ट्र मंत्री होसेन अमीराबदोल्हियान यांना घेऊन जाणाऱ्या हेलिकॉप्टरला रविवारी (दि. १९) अपघात झाला. या दुर्घटनाग्रस्त झालेल्या हेलिकॉप्टरचे अवशेष डोंगराळ भागात सापडले असून, ते पूर्णतः जळून खाक झाले आहे. यामध्ये राष्ट्राध्यक्षांसह ( Iran President) एकूण ९ लोक होते. यातील कोणीही जिवंत नसल्याची पुष्टी इराणच्या सरकारी मीडियाने केली आहे. या दुर्घटनेवर भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दु:ख व्यक्त केले आहे. या संदर्भातील एक्स पोस्ट पीएम मोदींनी केली आहे.
पीएम मोदी यांनी केलेल्या एक्स पोस्टमध्ये म्हटले आहे की, "इराणचे इस्लामिक रिपब्लिकचे राष्ट्राध्यक्ष डॉ. सय्यद इब्राहिम रईसी ( Iran President) यांच्या निधनाने धक्का बसला आणि खूप दु:ख झाले. भारत-इराण द्विपक्षीय संबंध मजबूत करण्यात त्यांनी दिलेले योगदान नेहमीच स्मरणात राहिल. त्यांच्या कुटुंबीयांप्रती माझ्या संवेदना आणि श्रद्धांजली. या दु:खाच्या काळात भारत इराणच्या पाठीशी उभा आहे".
"घटनास्थळी हेलिकॉप्टरमधील प्रवासी अद्याप जिवंत असल्याची कोणतीही चिन्हे दिसून आलेली नाहीत," असे इराणच्या अधिकृत सरकारी टीव्हीने म्हटले आहे. प्रतिकूल हवामान असतानाही डोंगराळ प्रदेशात काही तास शोध घेतल्यानंतर बचाव पथकांना अपघातग्रस्त हेलिकॉप्टर सापडले. हे हेलिकॉप्टर पूर्णपणे नष्ट झाले आहे. या अपघातात राष्ट्राध्यक्ष इब्राहिम रईसी यांचे हेलिकॉप्टर पूर्णपणे जळून खाक झाले आहे, असे एका अधिकाऱ्याने रॉयटर्स वृत्तसंस्थेशी बोलताना सांगितले.
हेही वाचा: