पुढारी ऑनलाईन डेस्क: इराणचे राष्ट्राध्यक्ष इब्राहिम रईसी यांचे हेलिकॉप्टरला अपघात होऊन मृत्यू झाल्याचे वृत्त आज (दि.२० मे) सकाळी समोर आले होते. या (Iran President Ebrahim Raisi) वृत्ताने जगभरात खळबळ उडाली होती. मात्र अद्याप या दुर्घटनेतील मृतांचे मृतदेह सापडले नव्हते. दरम्यान इब्राहिम रईसी आणि इराणचे परराष्ट्रमंत्री होसेन अमीराबदोल्हियान यांचे मृतहेद सापडल्याची माहिती इराणी माध्यमांनी दिल्याचे वृत्त एएनआयने दिले आहे.
हेलिकॉप्टर अपघातात मृत्युमुखी पडलेल्या इराणचे अध्यक्ष इब्राहिम रायसी, त्यांचे परराष्ट्र मंत्री आणि इतर अधिकाऱ्यांचे मृतदेह इराणमधील तबरीझ शहरात आणण्यात आले, अशी माहिती इराण माध्यमांनी सोमवारी रेड क्रेसेंटचा हवाला देऊन दिली, असे एएनआयने दिलेल्या वृत्तात म्हटले आहे.
इराणचे राष्ट्राध्यक्ष इब्राहिम रईसी आणि परराष्ट्र मंत्री होसेन अमीराबदोल्हियान यांना घेऊन जाणाऱ्या हेलिकॉप्टरला रविवारी ( दि. १९) अपघात झाला होता. डोंगराळ भागात दाट धुक्यामुळे ही हेलिकॉप्टर दुर्घटना घडल्याचेही वृत्त माध्यमांनी दिली आहे. दरम्यान, दुर्घटनाग्रस्त झालेल्या हेलिकॉप्टरचे अवशेष डोंगराळ भागात सापडले असून ते पूर्णतः जळून खाक झाले आहे. तर हेलिकॉप्टरच्या अपघातस्थळी कोणीही वाचलेले सापडलेले नाही, अशी पुष्टी इराणच्या स्टेट मीडियाने सोमवारी केली होती.
सरकारी टीव्हीने दिलेल्या वृत्तात म्हटले होते की, "हेलिकॉप्टरमधील कोणीही वाचल्याचे दिसून आलेले नाही." हेलिकॉप्टरमध्ये एकूण ९ लोक होते. त्यात राष्ट्राध्यक्ष इब्राहिम रईसी, अब्दुल्लाहियान, तीन इराणी अधिकारी, एक इमाम आणि सुरक्षा दलाच्या सदस्यांचा समावेश होता, असे वृत्त CNN ने इराणी मीडियाचा हवाल्याने दिले आहे. तीन अधिकाऱ्यांमध्ये एक पूर्व अझरबैजान प्रांताचे गव्हर्नर मलेक रहमाती होते.
हेलिकॉप्टर अपघातात इराणचे राष्ट्राध्यक्ष इब्राहिम राईसी, परराष्ट्र मंत्री आणि इतर उच्चपदस्थ अधिकाऱ्यांच्या मृत्यूनंतर दिल्लीतील इराण दूतावासाने आपला ध्वज अर्ध्यावर उतरवला आहे.
हेही वाचा: