आंतरराष्ट्रीय स्तरावर युद्धविरामासाठी सुरू असलेल्या आवाहनांकडे दुर्लक्ष करत इस्रायल आणि इराणमधील सुरू असलेला संघर्ष अधिकच तीव्र होत चालला आहे. दोन्ही देशांनी एकमेकांवर हल्ले तीव्र केले आहेत. इस्रायलने सलग तिसर्या दिवशी इराणवर हल्ला करत परराष्ट्र मंत्रालयासह अनेक सरकारी इमारतींना लक्ष्य केले आहे. इराणने दावा केला आहे की, या नव्या हवाई हल्ल्यांच्या लाटेत अनेक नागरी वस्ती असलेल्या भागांनाही लक्ष्य करण्यात आले. इराण आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी इस्रायलकडून सुरू झालेल्या हल्ल्यांपासून आतापर्यंत मृतांचा आकडा २२४ वर पोहोचला असून, १,२७७ जण जखमी झाले वृत्त 'एपी'ने दिले आहे. या मृतांमध्ये किती जण सैनिकी होते आणि किती नागरी, हे स्पष्ट करण्यात आलेले नाही.
इस्त्रायलकडून इराणच्या अण्वस्त्र सुविधांना आणि सैनिकी नेतृत्वाला लक्ष्य करण्यात येत असून, तेहरानने शुक्रवारीपासून आतापर्यंत २७० पेक्षा अधिक क्षेपणास्त्रे डागल्याचा दावा इस्रायलने केला आहे. इस्रायलच्या बहुपदरी हवाई संरक्षण यंत्रणेमुळे बहुतेक क्षेपणास्त्रे अडवण्यात आली, तरी २२ क्षेपणास्त्र सुरक्षा कवच भेदून निवासी परिसरांवर आदळली. यामध्ये १४ लोक ठार, तर ३९० जण जखमी झाले. इस्रायलवर तेलशुद्धीकरण केंद्रांवर हल्ला केल्याचा आरोप इराणने केला असून, इस्लामिक रिव्होल्युशनरी गार्ड कॉर्प्स (IRGC) च्या गुप्तचर प्रमुखासह दोन वरिष्ठ जनरल्सना ठार करण्यात आल्याचे म्हटले आहे.
शुक्रवारी इस्रायलने इराणच्या अणु तळांवर हल्ला केला, त्यानंतर इराणनेही प्रत्युत्तर दिले. रविवारी ओमानमध्ये इराण आणि अमेरिका यांच्यातील अणु करारावर चर्चा होणार होती, परंतु इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणने या चर्चा पुढे ढकलल्या. इराणच्या लष्करी आणि सरकारी तळांना लक्ष्य करण्यासोबतच, इस्रायलने क्षेपणास्त्र प्रक्षेपण तळ आणि हवाई संरक्षण उपकरणे तयार करणाऱ्या कंपन्यांनाही लक्ष्य केले. इस्रायलचा दावा आहे की त्याच्या हल्ल्यांमध्ये अनेक उच्च इराणी लष्करी जनरल तसेच क्रांतिकारी गार्ड्सच्या गुप्तचर विभागाचे प्रमुख जनरल मोहम्मद काझेमी यांचा मृत्यू झाला आहे. इस्रायलने रविवारी इराणच्या परराष्ट्र मंत्रालयावर, लष्करी मुख्यालयावर तसेच शाहरान तेल डेपोवर हल्ला केला.
वॉशिंग्टनमधील एका मानवाधिकार संघटनेचा दावा आहे की इराणमध्ये मृतांचा आकडा ४०० च्या वर गेला आहे आणि ६५४ लोक जखमी झाले आहेत. इराणमधील पेट्रोल पंपांवर वाहनांच्या लांब रांगा आहेत. तथापि, इराण सरकारने तेलाचा तुटवडा नसल्याचा दावा केला आहे. राजधानी तेहरानमधील अनेक रस्ते बंद करण्यात आले आहेत. इस्रायलमध्ये मृतांची संख्या १४ वर पोहोचली आहे. हल्ल्यामुळे इस्रायली लोकांनी बंकरमध्ये आश्रय घेतला आहे.