इस्रायल v/s इराण : २००० वर्षांचा ज्यू द्वेष आणि रक्तरंजित संघर्ष; वाचा संपूर्ण इतिहास
पुढारी ऑनलाईन डेस्क : इस्रायल आणि पॅलेस्टाईन यांच्यात सुरू असलेला संघर्ष दिवसेंदिवस नवी वळणे घेऊ लागलेला आहे. संघर्षाचा विस्तारही वाढू लागलेला आहे. इस्रायलने लेबनॉनमध्ये जमिनीवरील कारवाई सुरू करताच इराणने इस्रायलवर क्षेपणास्त्रं डागली आहेत; पण या संपूर्ण संघर्षांची मूळ ही दोन हजार वर्षांपूर्वी पर्यंत जाऊन पोहचतात. इतिहासात डोकावून पाहिले तर युरोपमध्ये इसवी सन पूर्व काळापासून सुरू असलेल्या ज्यू द्वेषातून आजचा संघर्ष कसा उभा राहिला आहे, याचे चित्र स्पष्ट होते. (Israel-Iran war) या संपूर्ण संघर्षांचे मूळ आहे ते म्हणजे Anti Semitism म्हणजेच ज्यू द्वेषात. आपण समाजात वेगवेगळे द्वेष पाहातो अशा विविध प्रकारच्या द्वेषांतील सर्वांत जुना द्वेष म्हणजे ज्यू विरोध होय. या द्वेषाची पाळेमुळे भूतकाळात २ हजार वर्षं इतकी खोलवर गेलेली दिसतात.
प्राचीन रोमन साहित्यातही ज्यू धर्मीयांचा द्वेष
ज्यू द्वेषाची सुरुवात ही रोमन साम्राज्यापासून आणि ख्रिस्ती धर्माच्या आधी झालेली पाहायला मिळते. रोमन अनेक ईश्वारवादी होते. तर ज्यू धर्मीय एकाचा ईश्वरावर विश्वास ठेवतात. त्यामुळे रोमन नेहमी ज्यू धर्मीयांना संशयाच्या नजरेने पाहात. प्राचीन रोमन साहित्यात ज्यू धर्मीयांचा उल्लेख दारूडे, गुंड असा उल्लेख आहे.
ज्यू विरुद्ध ख्रिस्ती
येशू ख्रिस्तांना रोमन्सनी क्रुसावर चढवल्यानंतर ही परिस्थिती अधिकच चिघळत गेली. ज्यू हेच येशूंचे मारेकरी असे चित्र रंगवण्यात आले. यातून ज्यू विरुद्ध ख्रिश्चन असा संघर्ष आकारास आला. इसवी सन ७० मध्ये टेंपल ऑफ जेरुसलेम रोमनांनी पाडले होते. पुढे इसवी सन ३१२मध्ये रोमन सम्राट कॉन्सटॅटिनने ख्रिस्ती धर्म स्वीकारला. त्यानंतरच्या काळात ज्यू विरोधातील द्वेष वाढत गेला. ज्यू विरोधी प्रचार मोठ्या प्रमाणावर चालवला जात असे. युरोपमधील सर्व समस्यांना ज्यू लोकांना जबाबदार धरले जायचे. उदाहरण म्हणजे ११४४ मध्ये एका ११ वर्षाच्या ख्रिस्ती मुलाची हत्या झाली होती. या खुनाचा ठपका ज्यू धर्मीयांवर ठेवण्यात आला. ज्यू ख्रिस्ती मुलांची हत्या करून त्यांचे रक्त जादूटोण्यात वापरतात, असा अपप्रचार करण्यात आला होता. १४ व्या शतकातील काळ्या प्लेगच्या साथीचा फैलाव ज्यू लोकांनी केला, असाही अपप्रचार मोठ्या प्रमाणावर करण्यात आला. १२९०मध्ये ज्यूंना ब्रिटनमधून हकलून लावण्यात आले होते. त्यानंतर फ्रान्स (१३०६), स्वित्झर्लंड (१३४८) आणि १३९४ ला जर्मनीतून ज्यूंची हकालपट्टी करण्यात आली.
नाझी जर्मनीत ६० लाख ज्यूंची हत्या
१७०० व्या शतकात ही परिस्थिती सुधारत गेली. पण ज्यूंबद्दलाच द्वेष वेगवेगळ्या प्रकारे सुरूच होताच. या काळात पत्रकार विलहेम मार याने Anti Semitism हा शब्द वापरण्यास सुरुवात केली. ज्यूंबद्दलचा द्वेष दर्शवणारा हा शब्दप्रयोग त्यानंतर प्रचलित झाला. या काळात ज्यूंच्या विरोधाला वांशिक स्वरूप प्राप्त झाले. ज्यूंमुळे जर्मनीची वांशिक स्वरूप बदलत आहे, ही धारणा या वेळी सुरू झाली. या विचारधारेतून ज्यूंविरोधात हिंसाचाराच्या घटना घडू लागल्या. रशियन क्रांतीनंतर मोठ्या प्रमाणावर ज्यूंचे हत्याकांड झाले. २ हजार वर्षांच्या या द्वेषाचे परिपाक झाला तो म्हणजे 'नाझी जर्मनी'. हिटलरने या द्वेषाला वंशसंहाराचे रूप दिले. नाझी काळात जवळपास ६० लाख ज्यूंची हत्या झाली.
आधुनिक इस्रायलचा जन्म
ऑस्ट्रियातील एक ज्यू पत्रकार थिओडर हर्जल १८९१ला फ्रान्समध्ये आले. त्या काळात फ्रान्स क्रांतीची भूमी बनला होता; पण त्या काळात फ्रान्समध्ये ज्यू विरोध टोकाचा बनला होता. त्याच वेळी ज्यू असलेल्या फ्रान्सच्या कॅप्टनवर हेरगिरीचा खोटा आरोप लावण्यात आला होता, आणि फ्रान्समध्ये ज्यू धर्मीयांच्या विरोधात निदर्शने सुरू होती. त्यातून हर्जल यांनी ज्यूंसाठी स्वतःच देश असावा ही कल्पना मांडली. हर्जल यांनी ज्यू लोकांची प्राचीन भूमी म्हणजे आताचे पॅलिस्टाईन येथे हा देश बनवण्याचा विचार मांडला. येथून 'झायोनिझम' ही चळवळ सुरू झाली. स्वित्झर्लंडमध्ये हर्जल या मागणीसाठी परिषद घेतली, यात पॅलेस्टाईनमध्ये ज्यूंचे स्वतंत्र राष्ट्र स्थापन्याचा ठराव करण्यात आला. त्या काळी पॅलेस्टाईनमध्ये अरब लोक राहात होते. १८९६मध्ये हर्जल आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी ऑटमन साम्राज्याच्या सुलतानची भेट घेण्याचा प्रयत्न केला. ऑटमन साम्राज्याचे परकीय कर्ज आम्ही फेडू, तुम्ही आम्हाला पॅलेस्टाईनमध्ये वसाहतीची परवानगी द्या, असा प्रस्ताव हर्जल यांनी दिला, पण हा प्रस्ताव मान्य झाला नाही. त्यानंतर हर्जल आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी पॅलेस्टाईनमध्ये जमीन विकत घ्यायला सुरुवात केली. एकावेळी एक जागा, असे करत तेथे ज्यू लोकांचे स्थलांतर सुरू झाले.
अरब आणि ज्यू असा संघर्ष सुरू झाला...
पहिल्या महायुद्धात ऑटोमन साम्राज्याचा पाडाव झाला आणि पॅलेस्टाईन ब्रिटिशांच्या कब्जात गेले. या काळात ज्यू लोकांचे पॅलेस्टाईनमध्ये मोठ्या प्रमाणावर स्थलांतर सुरू झाले. नाझी जर्मनी काळात हे स्थलांतर आणखी वाढले. यातून अरब आणि ज्यू असा संघर्ष सुरू झाला. ब्रिटिश सरकारने पॅलेस्टाईनच्या फाळणीचा प्रस्ताव दिला; पण तो मान्य झाला नाही. दुसऱ्या महायुद्धाच्या अखेरीस ब्रिटिश पॅलेस्टाईनमधून बाहेर पडले आणि निर्णयाची जबाबदारी संयुक्त राष्ट्रांवर आली. संयुक्त राष्ट्रांनी ५५ टक्के भूभाग इस्रायलला, ४४ टक्के भूभाग पॅलेस्टाईनसाठी आणि जेरुसलमचा ताबा आंतरराष्ट्रीय संघटनांकडे असा प्रस्ताव दिला. हा प्रस्ताव इस्रायलने मान्य करत, स्वातंत्र्य घोषित केले. तर पॅलेस्टाईनने मात्र या प्रस्ताव धुडकावून लावला. याच वेळी अरब राष्ट्रांनी इस्रायलवर हल्ला केला. हे युद्ध इस्रायलने जिंकले. १९६७ला पुन्हा युद्ध झाले. हेही युद्ध इस्रायलने जिंकले.
प्रॉमिस लँड | What is Promise Land
ख्रिस्तपूर्व १००० वर्षांपूर्वी ज्यू धर्माचा उदय झाला. आता जिथे इस्रायल आहे, तेथे ते राहात होते, तसेच ते स्वतःला 'इस्रलाईट' म्हणवून घेत. अब्राहम, अब्राहम यांचा मुलगा आयजॅक आणि नातू जेकब हे ज्यूंचे पूर्वज होत. त्या काळात राजा डेव्हिडने जेरुसलेमची स्थापना केली तर राजा सोलोमनने पहिले ज्यू मंदिर बांधले होते. असेरियन साम्राज्य (ख्रिस्तपूर्व ७२२), बॅबेलियन्स (ख्रिस्तपूर्व ५९८), पर्शियन साम्राज्य (५३९ ख्रिस्तपूर्व), रोमन साम्राज्य (ख्रिस्तपूर्व ६३) आणि ऑटोमन साम्राज्य ( इसवी सन १५१७) अशा विविध आक्रमणात ज्यू लोकांना त्यांची मूळ भूमी सोडावी लागली होती. ज्यू धर्मीयांनुसार परमेश्वराने अब्राहम यांना वचन दिले होते, हे वचन होते 'मातृभूमी'चे. इस्रायलचे नेते 'प्रॉमिस लँड'चा उल्लेख करतात, याचा अर्थ म्हणजे परमेश्वराने वचन दिलेली जमीन. ही मातृभूमी म्हणजे आताचा इस्रायल होय.
'व्हॅटिकन'चे प्रयत्न
१९६५मध्ये रोमन कॅथॉलिक चर्चने येशू ख्रिस्तांच्या मृत्यूला ज्यू धर्मीय जबाबदार नसल्याचे स्पष्ट केले. पोप जॉन पॉल दुसरे यांनी १९८६ला इस्रायलला भेटही दिली होती. 'ज्यूंचा द्वेष म्हणजे ख्रिश्चनां'चा द्वेष होय, असेही त्यांनी म्हटले होते. २०११मध्ये पोप बेनेडिक्ट यांनी 'जिजस ऑफ नाझारेथ' हे पुस्तक लिहिले आहे, त्यात त्यांनी येशूंच्या मृत्यूला ज्यू धर्मीय जबाबदार नसल्याचे म्हटले आहे.
संदर्भ - १. How Israel and Palestine Became Enemies | Flashback with Palki Sharma
२. Why are Jews Targeted? The Origins of Antisemitism | Flashback with Palki Sharma