

तेहराण; वृत्तसंस्था : अमेरिकेसोबतचा संघर्ष, आर्थिक निर्बंध आणि दबावाच्या कचाट्यात सापडलेल्या इराणच्या हाती मोठा खजिना लागला आहे. हा खजिना सोने-चांदीचा नव्हे, तर हायड्रोकार्बन वायूसाठ्याचा आहे. इराणकडे आधीपासूनच मोठा वायू साठा उपलब्ध आहे, परंतु या नव्या तब्बल ७.५ ट्रिलियन क्युबिक फूट खजिन्यामुळे त्याची आर्थिक ताकद आणखी कित्येक पटींनी वाढणार आहे. युद्धाच्या काळात सातत्याने संकटांचा सामना करणाऱ्या इराणसाठी ही बाब लॉटरी लागण्यासारखीच आहे.
इराणचे तेल मंत्री मोहसीन पाकनेझाद यांनी रविवारी 'गव्हर्नमेंट वीक' निमित्त आयोजित कार्यक्रमादरम्यान या शोधाची घोषणा केली. इराणवरील आर्थिक निर्बंध आणि अमेरिकेकडून होणाऱ्या संभाव्य नाकेबंदीबाबत विचारले असता पाकनेझाद म्हणाले, माझ्याकडे हायड्रोकार्बनचा नवीन साठा सापडल्याची एक चांगली बातमी आहे. ईश्वराची कृपा आणि आमच्या सहकाऱ्यांच्या सततच्या मेहनतीमुळे हायड्रोकार्बन साठ्याचा एक विशाल खजिना मिळाला आहे, जो देशाच्या ऊर्जा भविष्यासाठी एक मजबूत पाया ठरेल. याबाबत अधिक माहिती योग्य वेळी दिली जाईल.
दरम्यान, इराणवरील निर्बंधांमुळे त्यांच्या अर्थव्यवस्थेतील महत्त्वाचे क्षेत्र, विशेषतः तेल उद्योग आणि आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील प्रवेश प्रभावित झाला आहे. या सर्व आर्थिक दबावानंतरही इराणने आपले अंतर्गत ऊर्जा स्रोत विकसित करण्याचे आणि ऊर्जा उत्पादन व निर्यातीची क्षमता वाढवण्याचे प्रयत्न सुरूच ठेवले आहेत.
५.७ ट्रिलियन क्युबिक फूट वायू बाहेर काढता येणार
दक्षिण फार्स प्रांतात ७.५ ट्रिलियन क्युबिक फूटहून अधिक वायूचा साठा आढळला असून, त्यापैकी सुमारे ५.७ ट्रिलियन क्युबिक फूट वायू बाहेर काढता येणे शक्य असल्याचे अनुमान आहे. आर्थिक निर्बंध आणि दबावाच्या काळात हा खजिना सापडल्यामुळे इराणच्या भविष्यातील ऊर्जा गरजांना मोठे पाठबळ मिळणार आहे.