Desalination Plants Attack : अरब देशांवर पिण्याच्या पाण्याचे संकट! इराणने संघर्षाची व्याप्ती वाढवली तर पाण्याच्या प्रत्येक थेंबासाठी आसुसतील लोक..

जर आखाती देशांतील या प्रकल्पांवरील हल्ले वाढले, तर कोट्यवधी लोकांसमोर पिण्याच्या पाण्याचे गंभीर संकट
Desalination Plants
अरब देशांवर पिण्याच्या पाण्याचे संकट! इराणने संघर्षाची व्याप्ती वाढवली तर पाण्याच्या प्रत्येक थेंबासाठी आसुसतील लोक..file photo
Published on
Updated on

iran attack desalination plants kuwait saudi arabia uae water supply

पुढारी ऑनलाईन : कुवेतने इराणवर त्यांच्या डिसॅलिनेशन (समुद्राच्या खाऱ्या पाण्याचे गोड पाण्यात रूपांतर करणाऱ्या) प्रकल्पाला लक्ष्य केल्याचा आरोप केला आहे. जर आखाती देशांतील या प्रकल्पांवरील हल्ले वाढले, तर कोट्यवधी लोकांसमोर पिण्याच्या पाण्याचे गंभीर संकट निर्माण होऊ शकते. आखाती देशांसाठी हे प्रकल्प इतके महत्त्वाचे का आहेत, ते जाणून घेऊया.

Desalination Plants
Water Awareness | पाण्याचा आदर करायला शिका!

इराण आणि आखाती देशांमधील वाढत्या तणावामुळे आता नव्या चिंतेला तोंड फुटले आहे. कुवेतने आरोप केला आहे की, इराणी दलांनी दुसऱ्यांदा त्यांच्या डिसॅलिनेशन प्रकल्पाला लक्ष्य केले. असे हल्ले सुरू राहिल्यास त्याचा परिणाम केवळ कुवेतपुरता मर्यादित राहणार नाही, तर संपूर्ण आखाती प्रदेशात पिण्याच्या पाण्याचे मोठे संकट निर्माण होऊ शकते.

आखाती देशांमध्ये नैसर्गिक गोड्या पाण्याचे स्रोत अत्यंत मर्यादित आहेत. येथे पाऊस अत्यल्प पडतो आणि हवामान बहुतांश वेळा उष्ण व कोरडे असते. त्यामुळे या देशांतील पिण्याच्या पाण्याची मोठी गरज समुद्राच्या खाऱ्या पाण्याचे शुद्धीकरण करून भागवली जाते.

चिंतेची बाब म्हणजे, अमेरिकेच्या हल्ल्यानंतर इराणमध्येही पाण्याची टंचाई निर्माण झाल्याचे सांगितले जात आहे. अशा परिस्थितीत इराण आखाती देशांमधील पाणीपुरवठा विस्कळीत करण्याचा प्रयत्न करू शकतो, अशी भीती व्यक्त केली जात आहे.

Desalination Plants
Water Scarcity Responsibility | पाणीटंचाई आणि आपण

गल्फ रिसर्च सेंटरच्या अहवालानुसार, भूजल आणि डिसॅलिनेशनमधून मिळणारे पाणी मिळून या प्रदेशातील सुमारे 90 टक्के पाण्याची गरज भागवली जाते. मात्र, हवामान बदलामुळे भूजलाची गुणवत्ता सातत्याने खालावत असल्याने आखाती देशांची डिसॅलिनेशन प्रकल्पांवरील अवलंबित्व पूर्वीपेक्षा अधिक वाढले आहे.

आखाती किनारपट्टीवर 400 हून अधिक डिसॅलिनेशन प्रकल्प

संयुक्त अरब अमिराती (UAE) पासून कुवेतपर्यंत आखाती किनारपट्टीवर 400 हून अधिक डिसॅलिनेशन प्रकल्प आहेत. अरब सेंटर वॉशिंग्टन डीसीच्या 2023 च्या अहवालानुसार, गल्फ कोऑपरेशन कौन्सिल (GCC) मधील सहा देशांकडे जगातील एकूण डिसॅलिनेशन क्षमतेपैकी सुमारे 60 टक्के क्षमता आहे. तसेच, जगात तयार होणाऱ्या गोड्या पाण्यापैकी जवळपास 40 टक्के उत्पादन याच देशांमध्ये होते.

कोणत्या देशात किती पिण्याचे पाणी डिसॅलिनेशनमधून मिळते?

अल जझीराच्या अहवालानुसार, कुवेतच्या 90 टक्के, ओमानच्या 86 टक्के, सौदी अरेबियाच्या 70 टक्के आणि संयुक्त अरब अमिरातीच्या 42 टक्के पिण्याच्या पाण्याचा पुरवठा या प्रकल्पांमधून केला जातो. जगात सर्वाधिक डिसॅलिनेटेड पाणी तयार करणारा देश म्हणजे सौदी अरेबिया.

डिसॅलिनेशन प्रकल्पावरील हल्ल्यानंतर इराणमध्ये पाण्याची टंचाई

इराणदेखील किश आणि केश्म (Qeshm) बेटांसारख्या किनारी भागांत डिसॅलिनेशन प्रकल्पांचा वापर करतो. मात्र, इराणकडे नद्या, धरणे आणि गोड्या पाण्याचे इतर स्रोतही असल्याने आखाती देशांच्या तुलनेत त्याचे या प्रकल्पांवरील अवलंबित्व कमी आहे.

इराणी अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, अलीकडील अमेरिकन हवाई हल्ल्यात होर्मोजगान प्रांतातील जास्क जिल्ह्यातील बुंजी गावातील डिसॅलिनेशन प्रकल्प पूर्णपणे उद्ध्वस्त झाला. होर्मोजगान वॉटर अँड वेस्टवॉटर कंपनीचे प्रमुख हमजेह पूर यांनी दावा केला की, या हल्ल्यात प्रकल्पातील पंप आणि वीज यंत्रणा नष्ट झाली. त्यामुळे सुमारे 20 गावांतील जवळपास 10 हजार नागरिकांचा पिण्याच्या पाण्याचा पुरवठा पूर्णपणे बंद झाला आहे.

तज्ज्ञांच्या मते, डिसॅलिनेशन प्रकल्पांवरील हल्ले सुरू राहिल्यास कोट्यवधी लोकांच्या पिण्याच्या पाण्याचा पुरवठा धोक्यात येऊ शकतो. याचा परिणाम केवळ नागरिकांवरच नव्हे, तर उद्योग, वीज निर्मिती आणि संपूर्ण आखाती प्रदेशाच्या अर्थव्यवस्थेवरही होईल. त्यामुळे या प्रदेशात आता केवळ तेलच नव्हे, तर पाणीही एक महत्त्वाचे सामरिक शस्त्र बनण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news