Iran Israel war : इस्रायल व इराणमधील हवाई संघर्ष आज (दि. १८ जून) सलग सहाव्या दिवशीही कायम राहिला आहे. दोन्ही राष्ट्रांनी एकमेकांवर नव्याने क्षेपणास्त्र हल्ले चढवले. इराणने इस्रायलवर हायपरसॉनिक क्षेपणास्त्र डागल्याचा दावा केला आहे. या संघर्षात प्रथमच हायपरसॉनिक क्षेपणास्त्राचा वापर झाल्याने दोन्ही देशातील संघर्षाचा भडका आणखी तीव्र होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
इराणकडून बुधवारी पहाटे इस्रायलच्या तेल अवीव शहरावर क्षेपणास्त्रांचा मारा करण्यात आला, ज्यामुळे शहरात मोठे स्फोट झाले. या प्रत्युत्तरात इस्रायली हवाई दलाने तेहरानजवळील संशयित लष्करी ठिकाणांवर हल्ले केले. इस्रायल सरकारने तेहरान परिसरातील नागरीकांना आधीच स्थलांतर करण्याचा इशारा दिला होता.
इराण आणि इस्त्रायलमधील संघर्ष तीव्र झाला असताना अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणला निर्विवाद शरणागती पत्करणाचे आवाहन केले आहे. तसेच अमेरिका आता संयम गमावत असल्याचा सूचक इशाराही ट्रम्प यांनी इराणचे सर्वोच्च नेते अयातोल्ला अली खोमेनी यांना दिला असल्याचे वृत्त 'राॅटसर्स'ने दिले आहे. दरम्यान, दोन्ही देशांमधील तणाव वाढत असताना राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी मंगळवारी (दि. १७ जून) इस्रायलचे पंतप्रधान बिन्यामिन नेतान्याहू यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा केली.