

Robot
बीजिंग: जगभरातील विविध देश एकीकडे त्यांचे अत्याधुनिक रोबोट्स बाजारात आणत असताना, चीनच्या एका स्टार्टअप कंपनीने सामान्यांना परवडणारे आणि क्रांतिकारी उत्पादन लॉन्च करून जागतिक तंत्रज्ञान क्षेत्रात खळबळ उडवून दिली आहे.
नोएटिक्स रोबोटिक्स नावाच्या चीनी कंपनीने 'बुमी' नावाचा माणसासारखा दिसणारा रोबोट लॉन्च केला आहे, ज्याची किंमत ऐकून सर्वांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. या रोबोटची किंमत एका प्रीमियम स्मार्टफोन, म्हणजे आयफोनच्या जवळपास ठेवली आहे. हा रोबोट केवळ 9,998 युआन, म्हणजेच सुमारे 1 लाख रुपयांमध्ये खरेदी करू शकता. विशेष म्हणजे, इतर मोठ्या कंपन्यांचे रोबोट याच्या तुलनेत 30 ते 100 पटीने अधिक महाग असतात.
रोबोट केवळ श्रीमंतांसाठी किंवा मोठ्या कारखान्यांसाठी नसतात, हे नोएटिक्स रोबोटिक्सने सिद्ध केले आहे. कंपनीने 41 दशलक्ष डॉलर्सची मोठी गुंतवणूक मिळवली आहे. विक्री सुरू झाल्यावर कंपनीने पहिल्या एका तासातच 100 हून अधिक रोबोट्सची विक्री करून मोठा विक्रम नोंदवला. हा 94 सेंटीमीटर उंचीचा रोबोट प्रामुख्याने मुलांचा मित्र बनण्यासाठी आणि त्यांना विविध गोष्टी शिकवण्यासाठी डिझाइन करण्यात आला आहे.
किमतीच्या रहस्याचा खुलासा
रोबोटची किंमत इतकी कमी कशी ठेवली, याबाबत कंपनीचे संस्थापक जियांग झेयुआन यांनी माहिती दिली. त्यांनी तीन महत्त्वाचे बदल केले. कंट्रोल बोर्ड आणि मोटर ड्रायव्हर बाहेरून खरेदी करण्याऐवजी स्वतः तयार केले. रोबोट हलका करण्यासाठी मिश्रित पदार्थांचा वापर केला. त्यामुळे रोबोटचे वजन घटून फक्त 12 किलो झाले आणि लहान मोटर-बॅटरी वापरणे शक्य झाले. जवळपास 100 टक्के सुटे भाग चीनमध्येच बनवल्यामुळे वाहतूक खर्च कमी झाला आणि उत्पादन खर्च नियंत्रणात राहिला.
बुमी काय करू शकतो?
'बुमी' रोबोटहा शिक्षण आणि मनोरंजनासाठी बनवला गेला आहे. लहान आकारामुळे तो घर किंवा शाळेत सहजपणे बसू शकतो. डेव्हलपर्ससाठी हा एक खुला प्लॅटफॉर्म असून, ते यामध्ये नवीन वैशिष्ट्ये जोडू शकतात. नोएटिक्सला 'बुमी' केवळ एक गॅझेट नव्हे, तर लोकांना त्यांचे विचार तपासून पाहण्यासाठीचा एक महत्त्वाचा प्लॅटफॉर्म बनवायचा आहे.
भविष्यात प्रत्येक घरात रोबोट?
नोएटिक्स कंपनीने 2025 च्या अखेरपर्यंत दरमहा 1,000 रोबोट्स तयार करण्याचे लक्ष्य ठेवले आहे. सध्या बीजिंग आणि चांगझोऊ येथे प्लांट कार्यरत आहेत आणि लवकरच तिसरा प्लांट सुरू करण्याची योजना आहे. कंपनीच्या म्हणण्यानुसार, जर सर्व योजना यशस्वी झाल्या, तर लवकरच सामान्य लोकांच्या घरांमध्येही रोबोट्स दिसायला लागतील.