Indians deported from US : अमेरिकेतून दररोज ८ भारतीयांची होतेय हकालपट्टी; ट्रम्प सत्तेत येताच प्रमाण तिपटीने वाढले!
Indians deported from US
बंगळूर : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी यावर्षी जानेवारीत पुन्हा अमेरिकेची सूत्रे हाती घेतल्यानंतर भारतीयांच्या हकालपट्टीत लक्षणीय वाढ झाली आहे, हे आता लपून राहिलेले नाही. मात्र, ही वाढ बायडेन प्रशासनाच्या आणि ट्रम्प यांच्या मागील कार्यकाळाच्या तुलनेत कितीतरी अधिक आहे, हे आता समोर आले आहे. या वर्षापासून दररोज सरासरी किमान ८ भारतीयांना परत पाठवण्यात आले आहे, तर यापूर्वीच्या काळात (जानेवारी २०२० ते डिसेंबर २०२४) हे प्रमाण दररोज सुमारे ३ होते.
परराष्ट्र मंत्रालयाने (MEA) दिलेल्या माहितीनुसार, जानेवारी २०२० ते जुलै २०२५ या साडेपाच वर्षांच्या कालावधीत विविध कारणांमुळे ७,२४४ भारतीयांची हकालपट्टी करण्यात आली. धक्कादायक बाब म्हणजे, यापैकी जवळपास एक चतुर्थांश म्हणजेच १,७०३ जणांना ट्रम्प दुसऱ्यांदा सत्तेत आल्यानंतरच्या अवघ्या काही महिन्यांत परत पाठवण्यात आले आहे.
अमेरिकेची कठोर भूमिका आणि कडक इशारा
हकालपट्टीतील ही वाढ अमेरिकेच्या कठोर धोरणांमुळे झाली आहे. २६ जून रोजी, अमेरिकेच्या परराष्ट्र विभागाने स्पष्ट केले की, "व्हिसा दिल्यानंतरही तपासणी थांबत नाही. आम्ही सर्व व्हिसाधारकांची सतत तपासणी करतो आणि त्यांनी अमेरिकेच्या कायद्यांचे आणि इमिग्रेशन नियमांचे पालन न केल्यास त्यांचे व्हिसा रद्द करून त्यांना देशाबाहेर काढले जाईल."
हा इशारा कायदेशीर स्थलांतरितांसाठी होता. तर, याच्या काही दिवसांपूर्वीच अमेरिकेने बेकायदेशीर स्थलांतरितांसाठी म्हटले होते, "अमेरिकेने इमिग्रेशन कायद्यांची अंमलबजावणी आणि बेकायदेशीर स्थलांतरितांची हकालपट्टी तीव्र केली आहे. बेकायदेशीर प्रवेशामुळे अटक, हकालपट्टी आणि भविष्यातील व्हिसा पात्रतेवर कायमस्वरूपी गंभीर परिणाम होतील. खर्चिक आणि धोकादायक मार्गाने प्रवास केल्यास तुम्हाला तुरुंगात किंवा मायदेशी परतावे लागेल."
कशा पद्धतीने निर्वासित पाठवले गेले?
परराष्ट्र मंत्रालयाच्या माहितीनुसार, यावर्षी हकालपट्टी झालेल्या १,७०३ पैकी ८६४ जणांना चार्टर्ड आणि मिलिटरी फ्लाइट्सद्वारे परत पाठवण्यात आले. फेब्रुवारीमध्ये ५, १५ आणि १६ तारखेला US Customs आणि Border Protectionने ३३३ जणांना परत पाठवले. मार्च १९, जून ८ आणि जून २५ रोजी ICE (US Immigration and Customs Enforcement) ने २३१ लोकांना निर्वासित केले. DHS नेही जुलै ५ आणि १८ रोजी ३०० भारतीयांना परत पाठवले. तर ७४७ जण व्यावसायिक फ्लाइटने परत आले, आणि ७२ लोक पनामा येथूनही अशाच फ्लाइटने परत आले.
मानवी दृष्टिकोनातून हकालपट्टीची मागणी
भारताकडे अमेरिकेत जाणाऱ्या बेकायदेशीर स्थलांतरितांची अचूक आकडेवारी नाही. हकालपट्टीच्या प्रक्रियेसाठी भारत पूर्णपणे अमेरिकन अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीवर अवलंबून आहे. परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले आहे की, "हकालपट्टीची प्रक्रिया मानवी दृष्टिकोनातून व्हावी यासाठी आम्ही अमेरिकन अधिकाऱ्यांच्या संपर्कात आहोत. विशेषतः महिला आणि मुलांच्या हातापायात बेड्या घालण्याच्या प्रकारांवर तसेच इतर सांस्कृतिक आणि धार्मिक संवेदनशीलतेच्या मुद्द्यांवर भारताने चिंता व्यक्त केली आहे."
हकालपट्टी झालेल्यांमध्ये ९० टक्के नागरिक ५ राज्यांमधील
यावर्षी हकालपट्टी झालेल्या १,७०३ भारतीयांच्या राज्यनिहाय आकडेवारीचे विश्लेषण केल्यास असे दिसून येते की, यात काही उत्तरेकडील राज्यांचा मोठा वाटा आहे. पंजाब : ६२०, हरियाणा : ६०४, गुजरात : २४५, उत्तर प्रदेश : ३८, गोवा : २६, या पाच राज्यांमधील नागरिकांचे प्रमाण ९० टक्क्यांपेक्षा जास्त आहे. इतर राज्यांमध्ये महाराष्ट्रातून २०, दिल्लीतून २०, तेलंगणातून १९, तामिळनाडूतून १७, आंध्र प्रदेश आणि उत्तराखंडमधून प्रत्येकी १२ जणांना परत पाठवण्यात आले, तर कर्नाटकातून केवळ ५ जणांची हकालपट्टी झाली.
