

कीव; वृत्तसंस्था : रशिया-युक्रेन युद्धाच्या पार्श्वभूमीवर रशियाने युक्रेनवर केलेल्या मोठ्या ड्रोन हल्ल्यात मूळच्या भारतीय कुसुम ग्रुपच्या सुमी येथील औषधनिर्मिती प्रकल्पाचे मोठे नुकसान झाले आहे. या हल्ल्यात एका व्यक्तीचा मृत्यू झाला असून अनेक जखमी झाल्याचे वृत्त आहे. प्रकल्पाची मुख्य इमारत पूर्णतः उद्ध्वस्त झाली असून प्राथमिक अंदाजानुसार या नुकसानीची व्याप्ती किमान ४०० कोटी रुपयांपर्यंत आहे. युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोल्दोमीर झेलेन्स्की यांनी सुमीमधील या हल्ल्याला आणि त्यातील नुकसानीला दुजोरा दिला आहे.
झेलेन्स्की यांच्या म्हणण्यानुसार, एका आठवड्यात रशियाने १,९०० हून अधिक ड्रोन, १,७०० हवाई बॉम्ब आणि सुमारे २५ क्षेपणास्त्रांचा वापर केला. रशिया अलीकडे मोठ्या संख्येने तुलनेने स्वस्त आणि वेगवान जेट-इंजिनयुक्त ‘शाहेद’ ड्रोन वापरत आहे. या ड्रोनचा वेग अधिक असल्याने त्यांना रोखणे युक्रेनच्या हवाई संरक्षण यंत्रणेसाठी आव्हानात्मक ठरत आहे.
कुसुम ग्रुप ५० हून अधिक, प्रामुख्याने जेनेरिक औषधांची निर्मिती करतो. युक्रेनसह उझबेकिस्तान, कझाकिस्तान आणि फिलिपिन्ससह नऊपेक्षा अधिक देशांमध्ये कंपनीची उत्पादने विकली जातात. कंपनी स्वतःला ‘भारतीय मूळ असलेली युक्रेनियन कंपनी’ असे संबोधते. रशिया-युक्रेन युद्ध सुरू झाल्यानंतरही सुमीतील प्रकल्पाचे काम सुरू ठेवले होते. मात्र, ताज्या हल्ल्यामुळे या प्रकल्पाला मोठा फटका बसला आहे.
झेलेन्स्की यांच्या माहितीनुसार, रशियाने एका रात्रीत युक्रेनवर १३५ हल्लेखोर ड्रोन सोडले. त्यापैकी ५० हून अधिक ड्रोन जेट इंजिनवर चालणारे होते. कीव, द्निप्रो, खार्किव्ह, डोनेत्स्क, सुमी आणि झापोरिझ्झिया या भागांना लक्ष्य केले. निवासी इमारती आणि महत्त्वाच्या पायाभूत सुविधांनाही हल्ल्यांचा फटका बसला असून काही भागांत वीजपुरवठा खंडित झाला.
रशियन ड्रोनने कीवमधील द्निप्रो नदीवरील पिव्हनिच्नी अर्थात नॉर्दर्न ब्रिजलाही लक्ष्य केले. हा पूल कीवच्या पूर्व आणि पश्चिम भागांना जोडणारा महत्त्वाचा मार्ग आहे. त्यामुळे राजधानीतील वाहतूक आणि पायाभूत सुविधांवर हल्ल्यांची टांगती तलवार आहे.
कुसुम ग्रुपची सुरुवात १९९४ मध्ये युक्रेनमध्ये भारतीय औषधांचे वितरण करणारी कंपनी म्हणून झाली. भारतीय नागरिक राजीव गुप्ता यांच्या नेतृत्वाखाली कंपनीने पुढे स्वतःच्या औषधांच्या ब्रँडच्या निर्मितीकडे वाटचाल केली. २००२ मध्ये कंपनीने इतर कंपन्यांच्या उत्पादनांचे वितरण थांबवून स्वतःच्या ब्रँडच्या औषधांच्या निर्मितीला सुरुवात केली. २००७ मध्ये भारतात उत्पादन प्रकल्प सुरू केल्यानंतर २००९ मध्ये युक्रेनमधील सुमी येथे उत्पादन प्रकल्प उभारला. त्यानंतर भारतात आणखी दोन उत्पादन सुविधा सुरू करण्यात आल्या.
दरम्यान, जर्मनीचे चान्सलर फ्रेडरिक मर्झ यांनी रविवारी अचानक कीवला भेट दिली. युक्रेनला युरोपीय पाठिंबा कायम असल्याचा संदेश देणे हा या भेटीचा उद्देश होता. मर्झ यांनी रशियाने युक्रेनविरोधातील युद्ध थांबवावे, असे आवाहन केले. रशियाला रोखले नाही, तर त्यांचे युद्धयंत्र भविष्यात युरोपकडे वळू शकते, असा इशाराही त्यांनी दिला. मर्झ आणि झेलेन्स्की यांनी रशियन हल्ल्यात नुकसान झालेल्या नॅशनल ॲॅकॅडमी ऑफ सायन्सेसच्या इमारतीची पाहणी केली. जर्मनीने युक्रेनसाठी सुमारे १.३ अब्ज युरोच्या मदत पॅकेजची घोषणा केली असून, त्यात शस्त्रास्त्रे, हवाई संरक्षण आणि आगामी हिवाळ्यापूर्वी ऊर्जा क्षेत्राच्या मदतीचा समावेश आहे.