

Indian origin Google engineer killed : अमेरिकेतील जॉर्जिया प्रांतात पतीने घरगुती वादातून भारतीय वंशाच्या पत्नीची गोळ्या झाडून हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. मृत महिला गुगलमध्ये ज्येष्ठ अभियंता म्हणून कार्यरत होती. या गोळीबारात त्यांचा तरुण मुलगाही गंभीर जखमी झाला आहे. पोलिसांनी आरोपी पतीला घटनास्थळावरूनच अटक केली आहे.
'फॉक्स न्यूज'ने दिलेल्या वृत्तानुसार, कोब काउंटीमधील दाम्पत्याच्या घरात हा गोळीबार झाला. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी धाव घेतली. घराबाहेर मुलगा जेसन वृझिएन गंभीर जखमी अवस्थेत रक्ताच्या थारोळ्यात पडलेला आढळला. पोलिसांनी घरात प्रवेश केला असता, ५७ वर्षीय शीतल वृझिएन या मृतावस्थेत आढळल्या.तपास पथकाने गुन्ह्याचा तपास करेपर्यंत पोलिसांनी संपूर्ण परिसराची नाकेबंदी केली होती. याप्रकरणी पोलिसांनी शीतल यांचे पती किर्क वृझिएन याला घटनास्थळावरूनच ताब्यात घेतले.
पोलिसांच्या प्राथमिक तपासानुसार, हा गोळीबार कौटुंबिक आणि घरगुती वादातून झाला आहे. मात्र, हत्येमागचे नेमके कारण काय होते, याचा तपास अद्याप पोलीस करत आहेत. आरोपी किर्क वृझिएन याच्यावर हत्या, गंभीर मारहाणीचे दोन गुन्हे आणि गुन्हा करताना बेकायदेशीरपणे बंदूक बाळगल्याचे दोन गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. सध्या त्याला कोब काउंटी अॅडल्ट डिटेंशन सेंटरमध्ये जामीन न देता कोठडीत ठेवण्यात आले आहे.
शीतल वृझिएन या टेक क्षेत्रात गेल्या दोन दशकांहून अधिक काळ कार्यरत होत्या. त्या गुगलमध्ये 'इंजिनिअरिंग लीडर' म्हणून मोठ्या पदावर कार्यरत होत्या. गुगलमध्ये रुजू होण्यापूर्वी त्यांनी 'होम डेपो' (Home Depot) या प्रसिद्ध रिटेल कंपनीच्या ई-कॉमर्स व्यवसायासाठी मोबाईल आणि डिजिटल ट्रान्सफॉर्मेशनचे नेतृत्व केले होते. कंपनीच्या गृहसजावट (Home Decor) क्षेत्रातील विस्तारात त्यांचा मोठा वाटा होता. त्यांचे बालपण इंग्लंड, भारत आणि घाना येथे गेले. त्यानंतर त्या अमेरिकेत स्थायिक झाल्या. त्यांनी १९९४ मध्ये 'जॉर्जिया इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी'मधून कॉम्प्युटर सायन्सची पदवी घेतली होती. टेक आणि स्टेम क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्या महिलांसाठी त्या एक उत्तम मार्गदर्शक (Mentor) म्हणून ओळखल्या जात असत.