

Indian nurse Nimisha priya to be executed in Yemen on 16 July
पुढारी ऑनलाईन न्यूज
केरळच्या पलक्कड जिल्ह्यातील रहिवासी आणि नर्स म्हणून काम करणाऱ्या निमिषा प्रिया यांना मध्यपुर्वेतील येमेन या देशामध्ये 16 जुलै 2025 रोजी फाशी देण्यात येणार आहे. 2017 साली येमेनच्या नागरिक तालाल अब्दो मेहदी यांच्या हत्येप्रकरणी त्यांना मृत्युदंडाची शिक्षा सुनावण्यात आली होती.
निमिषा प्रिया 2008 मध्ये येमेनमध्ये गेली होती आणि काही रुग्णालयांमध्ये काम केल्यानंतर 2015 मध्ये तिने स्वतःचे क्लिनिक सुरू केले होती. स्थानिक कायद्यानुसार, तिने क्लिनिक चालवण्यासाठी येमेनच्या नागरिक तालाल अब्दो मेहदी यांना भागीदार म्हणून ठेवले होते.
कुटुंबाच्या माहितीनुसार, मेहदी यांच्याकडून आर्थिक फसवणूक झाल्याचा आरोप निमिषाने केला होता. तसेच त्यांच्याकडून तिचा पासपोर्ट परत घेण्यासाठी तिने त्यांना इंजेक्शन दिले, जे त्यांना बेशुद्ध करण्यासाठी होते. मात्र त्यातून मेहदी यांचा मृत्यू झाला, असा आरोप आहे.
त्यानंतर पळून जाण्याच्या प्रयत्नात असताना पोलिसांनी तिला अटक केली. 30 डिसेंबर 2024 रोजी येमेनचे राष्ट्रपती राशाद अल-अलिमी यांनी तिच्या मृत्युदंडाला अंतिम मंजुरी दिली होती.
दरम्यान, ‘सेव्ह निमिषा प्रिया’ ॲक्शन कौन्सिलचे सदस्य आणि मानवाधिकार कार्यकर्ते सॅम्युअल जेरोम यांनी दिलेल्या माहितीनुसार, येमेनमधील तुरुंग प्रशासनाने अधिकृतरित्या फाशीची तारीख जाहीर केली आहे आणि निमिषाला त्याची माहिती दिली आहे. मात्र अजूनही आशा आहे की जर पीडित कुटुंब क्षमा करत असेल आणि ‘ब्लड मनी’ (पैशाच्या रुपात भरपाई) स्वीकारत असेल, तर फाशी टाळता येऊ शकते.
निमिषाची आई प्रेमा कुमारी गेल्या वर्षभरापासून येमेनमध्ये आहेत आणि आपल्या मुलीला वाचवण्यासाठी प्रयत्न करत आहे. ‘सेव्ह निमिषा प्रिया’ समितीच्या सदस्य बाबू जॉन यांनीही याला दुजोरा दिला.
तालाल मेहदी यांच्या कुटुंबास 10 लाख अमेरिकन डॉलर्स (सुमारे 8 कोटी भारतीय रुपये) ‘ब्लड मनी’ म्हणून देण्याची ऑफर करण्यात आली आहे. मात्र, मेहदी कुटुंबाने अद्याप ही ऑफर स्वीकारलेली नाही, असे जेरोम यांनी स्पष्ट केले. सर्व कायदेशीर पर्याय संपल्याने आता क्षमाच मागण्याचा मार्गच उरलेला आहे.