

Kranti Gaud INDW vs PAKW :
महिला वनडे वर्ल्डकपच्या सामन्यात भारतीय महिला संघानं कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानचा पराभव केला. भारताचं २४८ धावांचं आव्हान घेऊन मैदानात उतरलेल्या पाकिस्तानला १५९ धावांपर्यंतच मजल मारता आली. भारताच्या या ८८ धावांच्या विजयात युवा वेगवान गोलंदाज क्रांती गौड हिचा मोलाचा वाटा होता. तिनं १० षटकात फक्त २० धावा देत ३ विकेट्स घेतल्या. तिला दिप्ती शर्मानं देखील ३ विकेट्स घेत चांगली साथ दिली.
दरम्यान, सामन्यावेळी क्रांती गौडनं कर्णधार हरमनप्रीत कौरच्या निर्णयाला विरोध केल्याचं दिसलं. तिनं हरमनप्रीतच्या एक कल्पना नाकारली. मात्र याचा टीम इंडियालाच फायदा झाला. क्रांतीनं पाकिस्तानच्या आलिया रियाझला बाद केलं अन् भारताची सामन्यावरील पकड मजबूत झाली. हा सर्व प्रकार भारतीय संघ गोलंदाजी करत असताना १२ व्या षटकात घडला.
भारतानं पाकिस्तानसमोर २४८ धावांचं आव्हान ठेवलं. त्याचा पाठलाग करताना पाकिस्तानला संघर्ष करावा लागला. त्यांच्या धावा होत नव्हत्या मात्र भारताला देखील विकेट मिळाली नव्हती. ११ व्या षटकात पाकिस्तानची अवस्था २ बाद २६ धावा अशी झाली होती.
१२ वं षटक सुरू होण्यापूर्वी हरमनप्रीत कौरनं क्रांती गौडला सेकंड स्लीमधील खेळाडू हटवूया असं सांगितलं. मात्र २२ वर्षाच्या क्रांतीनं कर्णधाराच्या या निर्णयाला विरोध केला. तिनं कौरला सेकंड स्लीप असू दे अशी विनंती केली. कौरनं देखील क्रांतीची विनंती मान्य केली अन् सेकंड स्लीप तसाच ठेवला.
याचा परिणाम षटकाच्या पहिल्याच चेंडूवर दिसला. क्रांतीनं आलियाला चकवलं अन् चेंडू थेट दुसऱ्या स्लीमध्ये उभ्या असलेल्या दिप्ती शर्माच्या हातात विसावला. त्यानंतर क्रांतीनं हरमनप्रीतकडं इशारा केला अन् तिच्या चेहऱ्यावर एक हास्य उमटलं.
टीम इंडियातील युवा वेगवान गोलंदाज क्रांती गौड ही छत्तरपूर जिल्ह्यातील घुवाराची रहाणारी आहे. क्रांती सामन्यानंतर म्हणाली, 'वर्ल्डकपच्या सामन्यात प्लेअर ऑफ द मॅचचा पुरस्कार मिळाल्यामुळं मी खूप आनंदी आहे. माझ्या गावातील लोकांना अभिमान वाटला असेल. त्यांनी हा सामना पाहण्यासाठी गावात एलईडी स्क्रीन लावली होती. दिदीनं (हरमनप्रीत) मला सांगितलं होतं की चेंडू जुना झाला आहे आपण स्लीपमधला एक खेळाडू हलवू. मात्र मी म्हणाले की असू दे आणि तिथंच झेल गेला.'
ती पुढे म्हणाली, 'आधी चेंडू स्विंग होत होता. मात्र तो जुना झाल्यावर देखील स्विंग होत होता. ज्यावेळी मी माझ्या दुसऱ्या स्पेल टाकण्यासाठी आले त्यावेळी हरमनप्रीतनं सांगितलं की बॉल जुना झाला आहे स्पीप काढूयात. मी म्हणाले सध्या मला दोन स्लीपसह गोलंदाजी करू देत त्यानंतर पाहू. मला विकेट मिळेल असं वाटत होत. अन् तसंच झालं. मला दुसरी विकेट मिळाली. मला माझ्यावर विश्वास होता.
हरमनप्रीतनं देखील क्रांतीचं कौतुक केलं. ती म्हणाली, 'मी तिच्यावर खूप खुश आहे. हा आमच्यासाठी खूप महत्वाचा सामना होता. क्रांतीनं खूप चांगली गोलंदाजी केली. तिची कामगिरी जबरदस्त होती. रेणुकानं देखील तिला चांगली साथ दिली. आम्ही विकेट्स घेण्याच्या काही संधी निर्माण केल्या होत्या. मात्र आम्ही झेल सोडले. अखेर आम्ही सामना जिंकला मी खुष आहे.'