वॉशिंग्टन : वृत्तसंस्था
अमेरिकेत भारतीय वंशाच्या लोकसंख्येत 2010 ते 2017 या कालावधीत तब्बल 38 टक्के वाढ झाली आहे. 2010 मध्ये ही लोकसंख्या 31 लाख 83 हजार 63 इतकी होती. 2017 मध्ये ती वाढून 44 लाख 2 हजार 363 इतकी झाली आहे. साऊथ एशियन अमेरिकन लिडिंग टुगेदर (साल्ट) या संस्थेच्या अहवालात ही माहिती समोर आली आहे.
दरम्यान, 6 लाख 30 हजार भारतीय वंशाचे लोक येथे अवैधरीत्या राहत असून त्या सर्वांच्या व्हिसाची मुदत संपली आहे. 2010 नंतर अमेरिकेत अवैधरीत्या वास्तव्य करत असलेल्या भारतीयांच्या संख्येत 78 टक्के वाढ झाली आहे.
अमेरिकेत दक्षिण आशियाई देशांचे जवळपास 50 लाख लोक राहत आहेत. 2010-17 दरम्यान नेपाळी लोकांच्या संख्येत सर्वाधिक 206.6 टक्के वाढ झाली. तर भूतानी लोकांच्या संख्येत 38 टक्के, पाकिस्तानी 33 टक्के, बांगलादेशी 26 टक्के, श्रीलंकन 15 टक्के अशी वाढ झाली आहे. लोकसंख्येच्या सर्व्हेनुसार 2016 च्या निवडणुकीत आशियाई वंशाच्या 49.9 टक्के लोकांनी मतदान केले होते. 2001 दक्षिण आशियाई वंशाच्या मतदारांची संख्या 20 लाख होती ती 2016 मध्ये 50 लाख झाली आहे. यातील 15 लाख भारतीय आहेत. तर, पाकिस्तानी वंशाचे 2 लाख 22 हजार 252 लोक आणि बांगलादेशी 69,825 आहेत.
या अहवालातील माहितीनुसार दक्षिण आशियाई देशातील 10 टक्के लोक (4 लाख 72 हजार) अत्यंत गरीब परिस्थितीत जगत आहेत. यात 15.8 टक्के पाकिस्तानी, 23.9 टक्के नेपाळी, 24.2 टक्के बांगलादेशी आणि 33.3 टक्के भूतानचे लोक आहे. तथापि युएस इमिग्रेशन, कस्टम एनफोर्समेंट यांच्याकडून कारवाई होऊ शकते. 2017 नंतर आशियाई देशांच्या 3013 लोकांना बंदी बनवले गेले आहे. ऑक्टोबर 2014 पासून एप्रिल 2018 पर्यंत बॉर्डर पोलिसांनी आशियाई वंशाच्या 17 हजार 119 लोकांना ताब्यात घेतले आहे.