

Javelin anti-tank missile system भारताने आपले लष्करी सामर्थ्य दृढ करण्यासाठी आणखी एक पाऊल उचलले आहे. भारत आता अमेरिकेकडून जॅव्हलिन अँटी-टँक गाईडेड मिसाईल सिस्टीम (ATGM) खरेदी करणार आहे. या मिसाईल सिस्टिमचे वैशिष्ट्ये म्हणजे ही सैनिकांना खांद्यावरुन कोठेही सहजपणे वाहून नेता येणर आहे. भारतातील अमेरिकेचे राजदूत सर्जिओ गोर यांनी शुक्रवारी याची घोषणा केली. यामुळे भारत - अमेरिका यांच्यातील संरक्षण संबध अधिक दृढ होण्याचे संकेत आहेत. या विषयी सांगताना गोर यांनी याला मोठी बातमी म्हटले आहे.
एक्स् पोस्ट करुन दिली बातमी
"मोठी बातमी! भारताने युद्ध-चाचणी केलेली जॅव्हलिन अँटी-टँक सिस्टीम खरेदी करण्याची योजना आखली आहे... यूएस-भारत संरक्षण संबंधात हे एक मोठे पाऊल आहे आणि सह-उत्पादनाच्या शक्यतांचे दरवाजे उघडतील. आमच्या दोन राष्ट्रांमधील प्रतिबद्धता रेकॉर्ड-उच्च पातळीवर आहे," गोर यांनी ट्विट केले.
काय आहे हे FGM-148 जॅव्हलिन ATGM
FGM-148 जॅव्हलिन ही जगातील सर्वात प्रगत मॅन-पोर्टेबल (एका सैनिकाने खांद्यावरून डागता येणारी) 'फायर अँड फॉरगेट' अँटी-टँक गाईडेड मिसाईल प्रणाली आहे. अमेरिकेतील लॉकहीड मार्टिन आणि रेथिऑन (Raytheon) कंपन्यांनी संयुक्तपणे ती विकसित केली आहे. याचे वजन केवळ २२ किलो असते त्यामुळे सैनिक सहजरित्या दुर्गम भागात ज्याठिकाणी इतर वाहने जाऊ शकत नाही तिथे नेऊ शकतो
काय आहेत वैशिष्ट्ये
यामध्ये इन्फ्रारेड कॅमेरा आणि थर्मल व्हिजन असते, ज्यामुळे रात्री किंवा धुरामध्येही शत्रूचे टँक स्पष्ट दिसतात. तसेच डिस्पोजेबल ट्यूबमध्ये मिसाईल असते, ज्यामध्ये वॉरहेड आणि रॉकेट मोटर बसवलेली असते.
CLU (Command Launch Unit): हा या गनचा मुख्य भाग असतो. सैनिक CLU मधील स्क्रीनद्वारे टँकला लॉक करतो.
मिसाईलमधील थर्मल/इन्फ्रारेड साधक (Seeker) टँकच्या उष्णतेचा आणि रचनेचा नकाशा तयार करून त्याच्यावर लक्ष केंद्रित करतो.
यामध्ये डागल्यानंतर मिसाईलला दिशा दाखवण्याची गरज नसते. मिसाईल स्वतः टँकचा पाठलाग करत अचूक धडकते. त्यामुळे मारा केल्यानंतर सैनिक तात्काळ सुरक्षित स्थळी निघून जाऊ शकतो.
हे मिसाईल लाँच करताना मागे आगीचा मोठा भडका होत नाही आणि सैनिक बंद खोलीतून किंवा बंकरमधूनही सुरक्षितपणे मारा करू शकतो.
टँकचा सर्वात कमकुवत भाग त्याचे छत असतो. या मोडमध्ये मिसाईल हवेत सुमारे १५० मीटर उंच जाते आणि थेट वरून टँकच्या छतावर आदळते, ज्यामुळे कितीही जाड आर्मर असलेला टँक एका फटक्यात नष्ट होतो. या एका मिसाईल सिस्टीमची १,७८,००० अमेरिकन डॉलर म्हणजे भारतीय चलनात अंदाजे १.५० कोटी ते १.६५ कोटी इतकी आहे
भारतासाठी का महत्वाचे हत्यार
भारताच्या लडाख, अरुणाचल प्रदेश यांसारख्या उंच पर्वतीय भागात जड रणगाडे नेणे कठीण असते. जॅव्हलिन हलकी (सुमारे २२ किलो) असल्याने सैनिक पर्वतांवर सहज वाहून नेऊ शकतात. चीन आणि पाकिस्तानच्या टँकला प्रत्युत्तर: शत्रूच्या आधुनिक रणगाड्यांना ४ किमी अंतरावरूनच निष्प्रभ करण्याची क्षमता भारतीय सैन्याला मिळणार आहे.
२०१० पासून हे हत्यार मिळवण्याचे प्रयत्न
भारतीय सैन्याने आपत्कालीन खरेदी अंतर्गत ATGM खरेदीसाठी ऑफर आणि स्वीकृती पत्र (LOA) वर स्वाक्षरी केली आहे. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि त्यांचे यूएस समकक्ष पीट हेगसेथ यांनी द्विपक्षीय संरक्षण संबंध अधिक दृढ करण्यासाठी 10 वर्षांच्या फ्रेमवर्कवर स्वाक्षरी केली आहे. या क्षेपणास्त्र प्रणाली खरेदीसाठी भारताकडून २०१० पासून प्रयत्न सुरु होते. आता याकरारानुसार पहिल्या टप्प्यात १०० क्षेपणास्त्र प्रणाली भारत खरेदी करणार आहे.
ही क्षेपणास्त्र प्रणाली 1990 च्या दशकाच्या मध्यात अमेरिकेच्या सशस्त्र दलांनी समाविष्ट केली होती. तेव्हापासून ते अनेक प्रकारांतून विकसित झाली आहे. बेस मॉडेलची कमाल श्रेणी 2,500 मीटर आहे, तर अधिक प्रगत FGM-148F प्रणाली 4,750 मीटरपर्यंत क्षेपणास्त्रे डागू शकते.