स्टॉकहोम, वृत्तसंस्था : भारताचा अणू कार्यक्रम पाकिस्तानला नेहमी धडकी भरवत आला. यातूनच पाकचे तत्कालीन पंतप्रधान झुल्फिकार अली भुट्टो सारखे म्हणत की, 'आम्ही गवत खाऊ; पण अणुबॉम्ब बनवू.' पाकिस्तान एक अणुबॉम्ब बनवून थांबला नाही. रतीबच जणू लावला इतका की, भारताहून संख्येने अधिक अण्वस्त्रे परवापरवापर्यंत पाकिस्तानकडे होती. या शस्त्रस्पर्धेने गवत खाण्याची तर नाही; पण एकवेळ उपाशी राहण्याची वेळ पाकिस्तानातील अनेक लोकांवर आज जरूर आली आहे. तर ताजी बातमी अशी की, अण्वस्त्रांच्या बाबतीत भारताने पाकिस्तानला मागे टाकले आहे; पण भारताच्या या कार्यक्रमाचा फोकस पाकिस्तानवर नव्हे, तर चीनवर आहे.
गतवर्षापर्यंत भारताकडे 164 अण्वस्त्रे होती, तर पाकिस्तानकडे 170 अण्वस्त्रे होती. चालू वर्षांत भारताकडील अण्वस्त्रांच्या संख्येत 8 ने वाढ झाली आहे.
स्वीडिश संस्था 'एसआयपीआरआय'च्या अहवालानुसार, चालू वर्षात भारताच्या अण्वस्त्रांची संख्या 172 झाली आहे, तर पाकिस्तानकडे 170 अण्वस्त्रे आहेत. अर्थात, भारताचा भर पाकिस्तानवर नव्हे, तर चीनवर आहे. भारताच्या भात्यातील लांब पल्ल्याची नवी अस्त्रे चीनच्या अनेक भागांत विध्वंस घडविण्याच्या क्षमतेची आहेत. संपूर्ण चीन भारतीय हल्ल्यांच्या कक्षेत यावा, ही भारताची योजना जवळपास पूर्णत्वाला पोहोचली आहे.
आकडे बोलतात
* 12,100 अण्वस्त्रांची संख्या गतवर्षांपर्यंत जगभरात होती.
* 12,121 वर ही संख्या आता पोहोचली आहे.
* 90 टक्के अण्वस्त्रे अमेरिका-रशियाकडे आहेत.
* 90 ने वाढ होऊन चीनची अण्वस्त्रे संख्या 410 वरून 500 झाली आहे.
* 3,904 अण्वस्त्रे ही सध्या अलर्टवर तैनात आहेत.
* 2,100 अण्वस्त्रे (अमेरिका-रशिया) क्षेपणास्त्रांसह हायअलर्टवर असतात. चीननेही असे सुरू केले आहे.