

पुढारी ऑनलाईन डेस्क: 2024-25 या आर्थिक वर्षात भारताची चीनसोबतची व्यापार तूट विक्रमी 99.2 अब्ज डॉलरवर पोहोचली असून, यामागे इलेक्ट्रॉनिक्स व ग्राहक वस्तूंच्या आयातीत झालेली मोठी वाढ कारणीभूत ठरली आहे. वाणिज्य मंत्रालयाच्या ताज्या आकडेवारीतून ही बाब समोर आली आहे.
अमेरिकेने चीनमधील वस्तूंवर टॅरिफ वाढविल्याने, चीनी कंपन्या आपली निर्यात भारतासारख्या देशांकडे वळवण्याची शक्यता वर्तवली जात आहे, ज्यामुळे भारतात स्वस्त वस्तूंच्या डंपिंगची भीती निर्माण झाली आहे.
मार्च महिन्यातच चीनमधून भारतात वस्तूंची आयात 25 टक्के वाढून 9.7 अब्ज डॉलर झाली. संपूर्ण वर्षभरात चीनमधून आयात वाढून ती 113.5 अब्ज डॉलरवर गेली तर याच काळात चीनला भारतातून होणाऱ्या निर्यातीत मात्र 14.5 टक्के घट होऊन ती केवळ 14.3 अब्ज डॉलर इतकी राहिली. मार्चमध्ये निर्यात फक्त 1.5 अब्ज डॉलर इतकी झाली.
व्यापार धोरण तज्ज्ञांच्या मते, "भारताला सावध राहण्याची गरज आहे. आयातीत झालेली वाढ ही भारतीय अर्थव्यवस्थेला धोकादायक आहे. इलेक्ट्रॉनिक्स, औषधे आणि अभियांत्रिकीसाठी आवश्यक अनेक सुट्या भागांसाठी चीनवर मोठ्या प्रमाणावर अवलंबून राहावे लागते. त्यामुळेच चीनमधून आयात वाढली आहे.
विशेष म्हणजे, सन 2013-14 च्या तुलनेत भारतीय रुपया अधिक मजबूत असतानाही सध्याच्या काळात भारताची चीनमधील निर्यात कमी आहे.
या परस्पर आयात-निर्यातीमुळे चीन आता भारताचा दुसऱ्या क्रमांकाचा व्यापार भागीदार झाला आहे. पहिल्या क्रमांकावर अमेरिका आहे. भारत आणि चीनमध्ये 2024-25 मध्ये एकूण व्यापार 127.7 अब्ज डॉलर इतका झाला.
अमेरिकेने चीनमधील वस्तूंवर आयातशुल्क वाढवल्यामुळे चीनी कंपन्या निर्यात इतर देशांकडे वळवू शकतात आणि भारत ही एक मोठी बाजारपेठ असल्याने धोका वाढतोय. भारत सरकारने स्वस्त आयातीवर नियंत्रण ठेवण्यासाठी विशेष निरीक्षण युनिट स्थापन करण्याचे नियोजन आखले आहे.
"चिनी निर्यातदारांना अमेरिकेच्या टॅरिफ टाळण्यासाठी मदत करू नका," असा स्पष्ट इशारा केंद्र सरकारने भारतीय कंपन्यांना दिला आहे.
भारत-चीन व्यापारातील तफावत केवळ आर्थिक आकड्यांपुरती मर्यादित नाही, तर ती भारताच्या औद्योगिक धोरण, स्थानिक उत्पादन क्षमतेचा अभाव आणि आंतरराष्ट्रीय व्यापारातील रणनीती यांचेही प्रतिबिंब आहे. चीन स्वस्त माल भआरतात डंपिंग करू शकतो.
यामुळे 'मेक इन इंडिया' आणि आत्मनिर्भर भारत या उपक्रमांसमोरही मोठे आव्हान निर्माण झाले आहे.