India vs Turkey BrahMos missile Cyprus Greece
नवी दिल्ली: आंतरराष्ट्रीय मुत्सद्देगिरीच्या पटावर भारताने एक मोठी खेळी खेळली आहे, ज्यामुळे तुर्की आणि त्याचा मित्र देश पाकिस्तानची झोप उडाली आहे. नुकतीच भारत आणि सायप्रस यांच्यात 'धोरणात्मक भागीदारी' झाली आहे. या भागीदारीमुळे भारताचे अत्यंत घातक क्षेपणास्त्र 'ब्रह्मोस' सायप्रस आणि ग्रीसपर्यंत पोहोचण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. परराष्ट्र मंत्री डॉ. एस. जयशंकर यांच्या सायप्रस दौऱ्याने या संपूर्ण घडामोडीला वेग आला आहे. सायप्रस भारताकडून 'ब्रह्मोस' सुपरसॉनिक क्रूझ क्षेपणास्त्र आणि कामिकाझे ड्रोन खरेदी करणार असून तुर्कीच्या सुरक्षा वर्तुळात खळबळबळ उडाली आहे.
नुकतेच सायप्रसचे अध्यक्ष निकोस क्रिस्टोडौलिड्स यांनी भारताचा दौरा केला होता, जिथे त्यांची पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबत महत्त्वाची बैठक झाली. यानंतर लगेचच परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर सायप्रसला गेले. या दौऱ्यानंतर दोन्ही देशांमध्ये एक संरक्षण सहकार्य रोडमॅप तयार करण्यात आला आहे.
ताज्या संरक्षण अहवालानुसार, सायप्रसने जगातील सर्वात वेगवान सुपरसॉनिक क्रूझ क्षेपणास्त्रांपैकी एक असलेल्या 'ब्रह्मोस'सह भारताचे घातक कामिकाझे ड्रोन खरेदी करण्याची इच्छा व्यक्त केली आहे. ही संभाव्य ब्रह्मोस खरेदी युरोपियन युनियनच्या 'SAFE' प्रोग्राम अंतर्गत ग्रीक सायप्रस प्रशासनाला मिळालेल्या सुमारे १.२ अब्ज युरोच्या संरक्षण पॅकेजमधून केली जाऊ शकते.
तुर्कीचे अध्यक्ष रेसेप तय्यिप एर्दोगान आणि अंकारा (तुर्कीची राजधानी) मधील संरक्षण विश्लेषकांसाठी हा एक मोठा धक्का आहे. याचे कारण म्हणजे, तुर्कीने अनेक दशकांपासून उत्तर सायप्रसवर बेकायदेशीर ताबा मिळवला आहे. सायप्रसकडे ब्रह्मोस आणि घातक ड्रोन सारखी क्षमता आल्यास प्रादेशिक लष्करी संतुलन पूर्णपणे बदलेल आणि तुर्कीच्या सुरक्षेला थेट धोका निर्माण होईल.
तुर्की प्रसारमाध्यमे आणि संरक्षण तज्ज्ञांना अशी भीती वाटत आहे की, भारतीय शस्त्रास्त्रांच्या मदतीने सायप्रस आणि ग्रीस मिळून तुर्कीविरुद्ध एक मजबूत आणि अभेद्य संरक्षण भिंत उभी करतील. तुर्कीमध्ये अशी चर्चा सुरू आहे की, भारतासाठी 'सायप्रस तर फक्त बहाणा आहे, आपली ब्रह्मोस ग्रीसपर्यंत पोहोचवणे हा मुख्य उद्देश आहे.' कारण ग्रीस आणि तुर्की यांच्यातही तीव्र भू-राजकीय आणि सागरी सीमा विवाद आहेत.
मे २०२५ मध्ये झालेल्या भारत-पाकिस्तान संघर्षादरम्यान तुर्कीने गुपचुपपणे पाकिस्तानला शेकडो ड्रोन पुरवले होते. याशिवाय, तुर्कीने काश्मीर मुद्द्यावर आंतरराष्ट्रीय मंचांवर सातत्याने पाकिस्तानची बाजू घेत आले आहेत. आता भूमध्य समुद्रात थेट तुर्कीच्या जवळ भारतीय शस्त्रास्त्रांची संभाव्य तैनाती करून भारताने चोख प्रत्युत्तर दिले आहे, असे मानले जात आहे.
सायप्रस आणि ग्रीस हे दोन्ही देश तुर्कीचे कट्टर प्रतिस्पर्धी आहेत. जर ब्रह्मोस सायप्रसकडे आली, तर तो तुर्कीसाठी खूप मोठा लष्करी धोका असेल, कारण हे क्षेपणास्त्र मॅक २.८ ते मॅक ३ च्या वेगाने अचूक हल्ला करण्यास सक्षम आहे. भारत आणि सायप्रस दरम्यान २०२६ ते २०३१ या काळासाठी द्विपक्षीय संरक्षण सहकार्याच्या महत्त्वाच्या रोडमॅपवर स्वाक्षरी झाली आहे, जी दोन्ही देशांना धोरणात्मक भागीदार बनवते.