

पुढारी ऑनलाईन डेस्क: पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांना १९ कोटी पौंड जमीन भ्रष्टाचारप्रकरणी दोषी ठरवण्यात आले आहे. त्यांना १४ वर्षाच्या तुरूंगवासाची शिक्षा ठोठावण्यात आली आहे. तर त्यांच्या पत्नी बुशरा बीबी यांना देखील या भ्रष्टाचार प्रकरणात दोषी ठरवण्यात आल्याचे वृत्त पाकिस्तानच्या डॉन न्यूजने दिल्याचे एएनआयने म्हटले आहे.
पाकिस्तानातील अल-कादिर ट्रस्ट जमीन भ्रष्टाचार प्रकरणात शुक्रवारी (दि.१७) माजी पंतप्रधान इम्रान खान आणि त्यांची पत्नी बुशरा बीबी यांना दोषी ठरवण्यात आले. क्रिकेटपटूपासून राजकारणी बनलेल्या इम्रान खान यांना १४ वर्षांची तुरुंगवासाची तर पत्नीला ७ वर्षाची शिक्षा सुनावण्यात आली आल्याचेही वृत्तात म्हटले आहे.
पाकिस्तानच्या राष्ट्रीय उत्तरदायित्व ब्युरो (NAB) ने डिसेंबर २०२३ मध्ये खान (७२), बीबी (५०) आणि इतर सहा जणांविरुद्ध राष्ट्रीय तिजोरीला १९० दशलक्ष पौंड (५० अब्ज पाकिस्तानी रुपये) नुकसान पोहोचवल्याचा आरोप करत खटला दाखल केला. या प्रकरणात न्यायालयाने बुशरा बीबीला सात वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली आणि खान यांना १० लाख पाकिस्तानी रुपये आणि त्यांच्या पत्नीला ५ लाख पाकिस्तानी रुपये दंड देखील ठोठावला आहे. तथापि, फक्त खान आणि बीबी यांच्यावरच खटला चालवण्यात आला आहे, कारण एका प्रमुख प्रॉपर्टी टायकूनसह इतर आरोपी सध्या पाकिस्तानबाहेर आहेत, असे डॉनने वृत्त दिले आहे.