

वॉशिंग्टन : पॅसिफिक महासागरामध्ये अत्यंत तीव्र अशा ‘अल निनो’ची निर्मिती होत असून, १९५० नंतरच्या सर्व नोंदी मोडीत काढणारा हा ऐतिहासिक ‘अल निनो’ ठरण्याची ६९ टक्के शक्यता अमेरिकेची संस्था ‘नॅशनल ओशियानिक अँड ॲटमॉस्फेरिक ॲडमिनिस्ट्रेशन’ने (एनओएए) वर्तवली आहे. हा हवामानविषयक बदल वर्षाच्या अखेरीस अधिक तीव्र होणार असून, उत्तर गोलार्धातील हिवाळ्यात त्याचा प्रभाव शिखरावर पोहोचण्याची शक्यता आहे.
‘एनओएए’च्या ‘अल निनो-सदर्न ऑसिलेशन’ बुलेटिननुसार, उत्तर गोलार्धातील हिवाळ्यात तीव्र ‘अल निनो’ निर्माण होण्याची शक्यता ९० टक्के आहे. ऑक्टोबर ते डिसेंबर या काळात हा प्रवाह ऐतिहासिक उच्चांक गाठू शकतो. जुलै महिन्यात ‘अल निनो’च्या तीव्रतेत वेगाने वाढ झाली असून, पुढील महिन्यांत तो अधिक विस्तारणार आहे. ‘अल निनो’मुळे जगभरात हवामान बदल, तीव्र दुष्काळ, उष्णतेची लाट आणि सरासरीपेक्षा कमी पाऊस पडण्याचा धोका वाढतो.
भारताच्या दृष्टीने ‘अल निनो’ चिंतेचा विषय ठरतो; कारण ऐतिहासिक नोंदीनुसार या काळात सरासरीपेक्षा कमी पाऊस पडतो. यंदाच्या मोसमात १ जून ते १३ ऑगस्ट या कालावधीत देशभरात ४९१.८ मि.मी. पाऊस झाला असून, तो सरासरीपेक्षा १२ टक्के कमी आहे. जून महिन्यात ३५.४ टक्के पावसाची तूट राहिली होती, तर जुलैमध्ये पाऊस सरासरीच्या जवळ पोहोचला. मात्र, भारतीय हवामान विभागाने ऑगस्ट आणि उर्वरित मोसमातही सरासरीपेक्षा कमी पावसाचा अंदाज दिला आहे.
‘अल निनो’चा भारतीय महासागरावर आणि भारताच्या परिसरावर प्रत्यक्ष प्रभाव पडण्यासाठी सुमारे ४० ते ४५ दिवसांचा कालावधी लागतो. तोपर्यंत ३० सप्टेंबरपर्यंत नैऋत्य मोसमी पाऊस परतीच्या प्रवासाला लागलेला असेल. याशिवाय, सध्या तटस्थ स्थितीत असलेला ‘इंडियन ओशन डायपोल’ मोसमाच्या अखेरीस ‘पॉझिटिव्ह’ होण्याचा अंदाज भारतीय हवामान खात्यानेे व्यक्त केला आहे. त्यामुळे ‘अल निनो’चा भारतीय मान्सूनवरील विपरीत परिणाम काही प्रमाणात रोखण्यास मदत होऊ शकते.