

पुढारी ऑनलाईन डेस्क : बांगलादेशमध्ये हिंदू अल्पसंख्याकांवरील हिंसाचार थांबण्याची चिन्हे दिसत नाहीत. उत्तर बांगलादेशातील दिनाजपूर जिल्ह्यातील हिंदू समुदायाच्या एका प्रमुख नेत्याचे अपहरण केल्यानंतर अमानुष मारहाण आणि छळ करून हत्या केल्याची संतापजनक घटना समोर आली आहे. या घटनेने बांगलादेशातील हिंदू समाजाची सुरक्षा आणि त्यांच्या अधिकारांबाबत गंभीर प्रश्न उपस्थित केले जात आहेत.
ढाक्यापासून सुमारे ३३० किमी वायव्येस असलेल्या दिनाजपूरमधील बासुदेबपूर गावातील रहिवासी भावेश चंद्र रॉय यांचा मृतदेह गुरुवारी सापडला, असे डेली स्टार या वृत्तवाहिनीने म्हटले आहे. स्थानिक माध्यमांच्या वृत्तानुसार, भावेश चंद्र हे परिसरातील हिंदू समुदायाचे प्रमुख नेते होते, जे बांगलादेश पूजा उद्यापन परिषदेच्या बिरल युनिटचे उपाध्यक्ष देखील होते.
भावेश चंद्र यांची पत्नी शांतना राय यांनी सांगितले की, गुरुवारी चार जण दोन मोटारसायकलींवरून आले आणि भावेश यांचे अपहरण केले. काही प्रत्यक्षदर्शकांनी सांगितले की, त्यांनी अपहरण करणाऱ्यांना भावेश यांना नराबारी गावात घेऊन जाताना पाहिले, जिथे त्यांना क्रूरपणे मारहाण केली गेली. नंतर एका व्हॅनमधून आणून त्यांना घराबाहेर फेकून दिले. त्यावेळी रॉय बेशुद्ध अवस्थेत होते. त्यांना त्वरित बिराल उपजिल्हा आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले, नंतर त्यांना दिनाजपूर मेडिकल कॉलेज रुग्णालयात हलविण्यात आले, मात्र तिथे डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.
दुसऱ्या एका घटनेत, हिंदू मुख्याध्यापक कांतिलाल आचार्य यांना बांगलादेश राष्ट्रीय पक्ष (BNP) आणि त्याच्या सहयोगी संघटनांनी जबरदस्तीने पदाचा राजीनामा देण्यासाठी भाग पाडले. स्थानिक मीडियाच्या माहितीनुसार, चटगांव येथील भटियारी हाजी तोबारक अली चौधरी हायस्कूलमध्ये आचार्य मुख्याध्यापक होते. त्यांच्यावर खोटे आरोप करून त्यांना मारहाण केली आणि त्यांना पदाचा राजीनामा द्यावा लावला. आचार्य यांची मुलगी भावना आचार्य यांनी सोशल मीडियावर त्यांच्या वडिलांना कोणतेही आरोप सिद्ध न करता पदाचा राजीनामा देण्यास भाग पाडल्याचे सांगितले.
बांगलादेशातील हिंदू समुदायाविरुद्धच्या हिंसाचाराच्या घटना थांबवण्यात मोहम्मद युनूस यांचे सरकार अपयशी ठरले आहे. ढाका येथील मानवाधिकार संघटना ऐन ओ सालिश केंद्र (AsK) ने गेल्या महिन्यात आपल्या अहवालात म्हटले आहे की बांगलादेशात हिंदू समुदायाची घरे, मंदिरे आणि व्यावसायिक प्रतिष्ठानांची तोडफोड करण्याच्या एकूण १४७ घटना घडल्या आहेत. या घटनांमध्ये सुमारे ४०८ घरांची तोडफोड करण्यात आली, ज्यात जाळपोळीच्या ३६ घटनांचा समावेश आहे. याशिवाय, अल्पसंख्याक समुदायाच्या व्यावसायिकांच्या तोडफोडीच्या ११३ घटना, अहमदिया पंथाच्या मंदिरे आणि मशिदींवर हल्ल्याच्या ३२ घटना आणि ९२ मंदिरांमध्ये मूर्ती तोडण्याच्या घटना नोंदवल्या गेल्या आहेत.