Guinness World Record | ‘जोनाथन’ ठरला जमीनीवर राहणारा सर्वात वयस्कर जीव, गिनीज बुकने बहाल केला 'ग्लोबल आयकॉन'चा किताब!

जगातील सर्वात वयस्कर कासव, १९४ वर्षे राहिला आहे जिवंत
Jonathan
Jonathan
Published on
Updated on

Guinness World Record ICON १९४ वर्षे वय असलेल्या 'जोनाथन' (Jonathan) या कासवाला 'गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड्स आयकॉन' म्हणून प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले आहे. साधारणपणे १८३२ मध्ये जन्म झाल्याचे मानले जाणारा जोनाथन हा १९४ वर्षांच्या प्रदीर्घ वयासह जमिनीवरील सर्वात वयस्कर जिवंत प्राणी ठरला आहे. वयाची १९४ वर्षे पूर्ण करणाऱ्या या कासवाचा गौरव जागतिक स्तरावर एक ऐतिहासिक घटना मानली जात आहे.

जोनाथन नावाचे हे कासव तो 'सेशेल्स जायंट टॉर्टॉइस' (Seychelles giant tortoise) या प्रजातीचा असून, या प्रजातीचे सरासरी आयुर्मान १५० वर्षे असते. त्याचे वय हा एक किमान अंदाज आहे आणि तो आपण समजतो त्यापेक्षा अधिक वयाचा असण्याची शक्यता आहे असे गिनीज बुकच्या प्रवक्याने म्हटले आहे. १८८२ मध्ये सेशेल्स या देशात तो पहिल्यांदा सापडला. तेव्हा त्‍याचे वय ५० वर्षे होते. सध्या जोनाथन सेंट हेलेना बेटावर वास्तव्यास आहे.

१८३२ मध्ये जन्म, दोन शतकांचा साक्षीदार

शास्त्रज्ञ आणि इतिहासकारांच्या मते, जोनाथनचा जन्म साधारणपणे १८३२ च्या सुमारास झाला असावा. याचाच अर्थ, जेव्हा जगात कॅमेरा, मोटार कार, विमान किंवा इंटरनेट यांपैकी कशाचाही शोध लागला नव्हता, तेव्हापासून जोनाथन या पृथ्वीवर अस्तित्वात आहे. त्याने मानवी इतिहासातील दोन जागतिक युद्धे, भारताचा स्वातंत्र्यलढा आणि चंद्रावर मानवाचे पाऊल पडतानाचा काळ पाहिला आहे.

१८८२ पासून सेंट हेलेना बेटावर निवास

जोनाथनला १८८२ मध्ये पूर्व आफ्रिकेतील सेशेल्समधून 'सेंट हेलेना' (St Helena) या दक्षिण अटलांटिक महासागरातील एका ब्रिटिश बेटावर आणण्यात आले होते. तेव्हा त्याचे वय ५० वर्षे होते आणि तो पूर्ण वाढ झालेला होता. तेव्हापासून आजतागायत तो तेथील राज्यपालांच्या अधिकृत निवासस्थानाच्या बागेत राहत आहे.

काय आहे कासवाचे वैशिष्ट्ये

या प्रजातीच्या कासवांचे सरासरी वय १५० वर्षे असते, मात्र जोनाथनने १९४ वर्षे जगून निसर्गाचा नियमच बदलून टाकला आहे. वाढत्या वयामुळे जोनाथनची दृष्टी कमजोर झाली असून त्याची वास घेण्याची क्षमताही कमी झाली आहे. मात्र, त्याचे ऐकणे चांगले आहे.

दैनंदिन जीवन आणि आहार

जोनाथन सध्या तिथे इतर तीन कासवांसोबत अगदी थाटात आणि संथ आयुष्य जगतो. त्याची काळजी घेण्यासाठी डॉक्टरांची एक विशेष टीम आहे, जी त्याला दर आठवड्याला हाताने ताजी फळे आणि भाज्या भरवते. त्याला कोबी, काकडी, सफरचंद आणि केळी खायला प्रचंड आवडते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news