Guinness World Record | या कुटुंबात गेल्या पाच पिढ्यात जन्माला येणाऱ्या मुलाची जन्मतारीख आहे ‘१४ सप्टेंबर’ : विक्रमाची गिनीज बुकमध्ये नोंद!

१९०७ मध्ये खापर पणजोबाचा तर २०२५ मध्ये परतवंडाचा जन्म झाला बरोबर १४ सप्टेंबर रोजीच
कडेवर असलेला आर्थर बेल, उजवीकडे आई एम्मा बेल व डावीकडे एम्माचे वडील डोनाल्ड हार्लो या तिघांचाही जन्म १४ सप्टेंबर रोजी झाला आहे.
कडेवर असलेला आर्थर बेल, उजवीकडे आई एम्मा बेल व डावीकडे एम्माचे वडील डोनाल्ड हार्लो या तिघांचाही जन्म १४ सप्टेंबर रोजी झाला आहे.
Published on: 
Updated on: 

Same Birthday five generations अमेरिकेतील एका कुटुंबाची परंपरा ऐकून तुम्हालाही आश्चर्य वाटेल. या कुटुंबातील तब्बल पाच पिढ्यांमधील सदस्यांचा जन्म एकाच तारखेला झाला आहे. विशेष म्हणजे, या अनोख्या योगाची नोंद थेट गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये झाली आहे. या वर्षी आर्थर बेल या चिमुकल्याच्या जन्मामुळे त्याच्या कुटुंबाने हा अनोखा विक्रम प्रस्थापित केला. आर्थरचा जन्म १४ सप्टेंबर २०२५ रोजी झाला. विशेष म्हणजे, त्याची आई एम्मा बेल हिचाही जन्म याच दिवशी झाला होता. त्यामुळे आई आणि मुलाचा वाढदिवस एकाच दिवशी साजरा होण्याचा आनंद कुटुंबाला मिळाला. मात्र, या जन्मामुळे कुटुंबातील पाच पिढ्यांचा जन्मदिवस एकच असल्याचा विक्रमही पूर्ण झाला.

याबाबत एम्मा हिने सांगितले की तिच्या कुटुंबात अनेक वर्षांपासून या अनोख्या योगाबाबत चर्चा व्हायची. तिची आजी दरवर्षी तिला १४ सप्टेंबर रोजी मुलगा जन्माला घालण्याबाबत गंमतीने सांगायची. एम्माच्या पहिल्या मुलाचा जन्म अपेक्षित तारखेच्या आधी झाला होता. मात्र दुसऱ्या मुलाचा मात्र बरोबर १४ सप्टेंबर रोजीच झाला.

पाच पिढ्यांची ही जन्मदिवसाची परंपरा

या अनोख्या परंपरेची सुरुवात आर्थरचे खापर पणजोबा विल्बर हार्लो यांच्यापासून झाली. त्यांचा जन्म १९०७ मध्ये १४ सप्टेंबर रोजी झाला होता. त्यानंतर आर्थरची पणजी ॲडी हार्लो यांचा जन्म १९४९ मध्ये १४ सप्टेंबर रोजीच झाला. पुढे आर्थरचे आजोबा डोनाल्ड हार्लो यांचा जन्म १९७२ मध्ये, तर आई एम्मा बेल हिचा जन्म १९९७ मध्ये १४ सप्टेंबर रोजी झाला. त्यानंतर आता आर्थरचा जन्मही याच तारखेला झाल्याने पाच पिढ्यांची ही परंपरा पूर्ण झाली. विशेष म्हणजे, या पाचही पिढ्यांमध्ये मुलगा, मुलगी, मुलगा, मुलगी आणि पुन्हा मुलगा असा क्रमही पाहायला मिळतो.

गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये ऐतिहासिक नोंद

यापूर्वी अनेक कुटुंबांमध्ये चार पिढ्यांतील सदस्यांचा जन्म एकाच दिवशी झाल्याची उदाहरणे समोर आली आहेत. मात्र, गिनीज वर्ल्ड रेकॉर्डच्या माहितीनुसार, एकाच जन्मतारखेला जन्मलेल्या पाच पिढ्यांची नोंद होण्याची ही पहिलीच वेळ आहे. तब्बल ११८ वर्षांच्या कौटुंबिक इतिहासात हा विलक्षण योग जुळून आला आहे. एम्मासाठी मुलगा आर्थरसोबत वाढदिवस साजरा करण्याची संधी ही आयुष्यातील सर्वात मोठी भेट आहे. हा योग जणू नियतीनेच जुळवून आणल्याची भावना तिने व्यक्त केली. सध्या पाच पिढ्यांचा हा अनोखा योग सध्या सर्वत्र चर्चेचा विषय ठरत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.