Guinness World Record : तब्बल ४० किलोमिटर पाण्यावर चालवली मोटरसायकल, चिनी बाईक रायडरचा गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड!

१७ वर्षांच्या प्रयत्‍नांना यश, यापूर्वीचा ३१.८ किलोमिटरचा विक्रम टाकला मागे
झांग शुए  Zhang Xue
झांग शुए Zhang Xue
Published on: 
Updated on: 

Guinness World Record जमिनीवर वेगाने धावणारी बाईक थेट पाण्यावर चालवणे ही केवळ काल्पनिक कथांमध्ये किंवा चित्रपटांत व्हिएफएक्स च्या तंत्रज्ञान किंवा कल्पनेत दिसणारी गोष्ट असू शकते. मात्र, चीनमधील एका दुचाकी कंपनीचे संस्थापक झांग शुए Zhang Xue यांनी हे प्रत्यक्षात आणून दाखवले आहे. झांग यांनी त्यांच्या मॉडीफाय केलेल्या 'MX450' बाईकच्या साहाय्याने पाण्यावर तब्बल ४०.७४ किलोमीटरचे अंतर पार करत नवा 'गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड' रचला आहे. या कामगिरीसह त्यांनी ३१.८ किलोमीटरचा जुना जागतिक विक्रम मागे टाकला. मध्य चीनमधील हुनान प्रांतातील हुआइहुआ शहरात एका विस्तीर्ण नदीमध्ये हा अनोखा विक्रम पार पडला.

सहा फेऱ्या पूर्ण करत गाठले ध्येय

विक्रमी प्रवासासाठी सकाळी ११ वाजता ठरवून दिलेल्या जलमार्गावर झांग यांनी बाईक चालवण्यास सुरुवात केली. त्यांनी एकूण सहा लॅप्स पूर्ण केले आणि कोणत्याही अडथळ्याविना ४०.७४ किमीचे अंतर यशस्वीरीत्या पार केले. सुरक्षेसाठी नदीत बचाव बोटी आणि वैद्यकीय पथके सज्ज ठेवण्यात आली होती. घटनास्थळी उपस्थित असलेल्या गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड्सच्या अधिकृत पंचांनी जीपीएस डेटा, वेळ आणि व्हिडिओ पुराव्यांची काटेकोर तपासणी करून या विक्रमावर शिक्कामोर्तब केले.

बाईकमध्ये काय बदल केले होते?

पाण्यावर बाईक चालवणे अत्यंत आव्हानात्मक असल्याने झांग यांच्या पथकाने सलग पाच महिने यावर संशोधन केले होते: दुचाकी पाण्यात बुडू नये यासाठी टायरला विशेष पाण्यावर तरंगणारे स्ट्रक्चर बसवण्यात आले, तसेच इंजिनमध्ये पाणी जाऊ नये म्हणून वॉटरप्रूफ सीलिंग करण्यात आले होते. पाण्याचा प्रचंड दाब, लाटांमध्ये वेगवान वळणे घेणे आणि बाईकचे संतुलन टिकवून ठेवणे ही सर्वात मोठी कसोटी होती. ती झांग यांनी यशस्वी पार पाडली.

१७ वर्षांपूर्वीचे अपयश आणि जिद्दीची गोष्ट

झांग शुए यांच्यासाठी हा केवळ रेकॉर्ड नसून तब्बल १७ वर्षांच्या जिद्दीचा विजय आहे. वयाच्या २२ व्या वर्षी त्यांनी पहिल्यांदा पाण्यावर बाईक चालवण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, त्यावेळी मर्यादित तंत्रज्ञानामुळे त्यांचे सलग चारही प्रयत्न अपयशी ठरले होते आणि ते अवघे २० मीटर अंतरच कापू शकले होते. १७ वर्षांनंतर आधुनिक तंत्रज्ञान आणि चिकाटीच्या जोरावर अखेर त्यांनी आपले हे अशक्य वाटणारे स्वप्न पूर्ण केले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news