

Google CEO Sundar Pichai on Nobel Prize in Physics : गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांनी मिशेल डेव्होरेट, जॉन मार्टिनिस आणि जॉन क्लार्क यांचे २०२५ चा भौतिकशास्त्रातील नोबेल पुरस्कार मिळाल्याबद्दल अभिनंदन केले आहे. तसेच दोन वर्षांत तीन नोबेल पारितोषिके मिळवणार्या शास्त्रज्ञांच्या कंपतीत काम करण्याचा अभिमान वाटत असल्याचे नमूद केले आहे.
एक्स (पूर्वीचे ट्विटर) वरील एका पोस्टमध्ये पिचाई यांनी लिहिले की, “आज सकाळी अशा कंपनीत काम करत असल्याचा अभिमान वाटतो जिथे पाच नोबेल विजेते आहेत. दोन वर्षांत तीन नोबेल पारितोषिके! मिशेल डेव्होरेट हे गुगलच्या क्वांटम एआय लॅबमध्ये हार्डवेअरचे मुख्य शास्त्रज्ञ आहेत, तर मार्टिनिस यांनी अनेक वर्षे लॅबच्या हार्डवेअर टीमचे नेतृत्व केले आहे."
पिचाई यांनी १९८० च्या दशकातील त्यांच्या सुरुवातीच्या संशोधनाचे कौतुक करताना म्हटले की,"१९८० च्या दशकात क्वांटम मेकॅनिक्समधील झालेल्या संशोधनामुळेच अलीकडील प्रगती आणि भविष्यातील त्रुटी-दुरुस्तीक्षम क्वांटम संगणकांसाठी मार्ग मोकळा झाला आहे."आपल्या पोस्टमध्ये त्यांनी गुगलच्या सांता बार्बरा क्वांटम लॅबला दिलेल्या भेटीबाबतही माहिती दिली. त्यांनी लॅबमधील प्रगतीला "अविश्वसनीय" असे म्हटले आहे. गुगल आता आपल्या आजी-माजी पाच नोबेल विजेत्यांची गणना करत असल्याचेही त्यांनी नमूद केले आहे.
गेल्या दोन वर्षांत गुगलशी संबंधित पाच शास्त्रज्ञांना नोबेल सन्मान मिळाला आहे.गुगल डीपमाइंडचे सीईओ डेमिस हसाबिस आणि जॉन जम्पर यांनी प्रथिने संरचना भाकित करण्याच्या त्यांच्या कार्यासाठी २०२४ चा रसायनशास्त्रातील नोबेल पुरस्कार पटकावला होता.या वर्षीचा भौतिकशास्त्र पुरस्कार विजेते मिशेल डेव्होरेट हे गुगलच्या क्वांटम एआय लॅबमध्ये हार्डवेअर संशोधनाचे नेतृत्व करतात.गुगलच्या माजी सहकाऱ्यांपैकी जेफ हिंटन यांना एआयमधील योगदानासाठी २०२४ चा भौतिकशास्त्रातील नोबेल पुरस्कार मिळाला, तर जॉन मार्टिनिस यांना क्वांटम हार्डवेअरमधील त्यांच्या नेतृत्वासाठी २०२५ चा भौतिकशास्त्र पुरस्कार मिळाला आहे.
डेमिस हसाबिस (रसायनशास्त्र, २०२४)
जॉन जम्पर (रसायनशास्त्र, २०२४)
जेफ हिंटन (भौतिकशास्त्र, २०२४)
मिशेल डेव्होरेट (भौतिकशास्त्र, २०२५)
जॉन मार्टिनिस (भौतिकशास्त्र, २०२५)