US - China Trade Deal Gold Rate: तिकडं अमेरिका-चीनची डील इकडं सोने चांदीचे दर कोसळले; जाणून घ्या किती रूपयांनी झालं स्वस्त
US - China Trade Gold Rate:
दक्षिण कोरियाच्या बुसान शहरात अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि चीनचे राष्ट्रपती शी जिंगपिंग यांच्यात बैठक झाली. त्या बैठकीत टॅरिफसह अनेक मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली. हे दोन्ही देश एका ट्रेड डीलवर साकारात्मक पद्धतीनं पुढं जाताना दिसत आहे. मात्र याचा थेट परिणाम हा सोने चांदीच्या दरांवर झाला आहे. सोने आणि चांदी या दोन्हीच्या दरात मोठी घसरण झाली आहे.
या आठवड्याच्या चौथ्या दिवशी गुरूवारी मल्टी कमोडिटी एक्सचेंज अर्थात MCX वर ट्रेड सुरू होताच सोन्याचा दर जवळपास २००० रूपयांनी कमी झाला. तर दुसरीकडं चांदीचा दर हा १६०० रूपयांनी कमी झाला. गेल्या काही दिवसांपासून सोने आणि चांदीच्या दरात मोठी घसरण होत आहे. बुधवारी मात्र सोने आणि चांदीच्या दरात थोडी सुधारणा झाली होती. मात्र आज पुन्हा एकदा दर कोसळण्यास सुरूवात झाली आहे.
एमसीएक्स गोल्ड रेट अपडेटवर नजर टाकली तर गुरूवारी ५ डिसेंबरची एक्सपायरी असलेल्या सोन्याची किंमत ही प्रती १० ग्रॅम १ लाख १८ हजार ६६५ पर्यंत खाली आली. आदल्या दिवशी बाजार बंद झाला त्याच्या तुलनेत आजचे सोन्याचे दर २००० रूपयांनी कमी झाले आहेत. यापूर्वी बुधवारी सोन्याचा दर वधारला होता. तो प्रती १० ग्रॅम १ लाख २० हजार ६६६ रूपयांपर्यंत पोहचला होता.
चांदीचेही दर पडले
फक्त सोने नाही तर चांदीचे देखील दर कोसळले आहेत. एमसीएक्सवर काल चांदीचा दर हा प्रती किलो १ लाख ४६ हजार रूपये इतका होता. मात्र आज बाजार उघडताच हा दर कोसळला. चांदी तब्बल १६०० रूपयांनी कमी झाली. चांदीचा प्रती किलो नवा दर हा १ लाख ४४ हजार ४०२ रूपये इतका खाली आला आहे.
या वर्षी सोने आणि चांदीच्या दराने रेकॉर्ड ब्रेक वाढ दर्शवली होती. सोन्याचा दर प्रती तोळा १ लाख ३२ हजार २९४ रूपयांपर्यंत पोहचला होता. मात्र गेल्या काही दिवसांमध्ये हे सोने जवळपास १३ हाजर ६२९ रूपयांनी स्वस्त झालं आहे. तर चांदीचा दर हा प्रती किलो १ लाख ७० हजार ४१५ रूपयांपर्यंत पोहचला होता. मात्र आता त्यात तब्बल २६ हजार १३ रूपयांची घसरण झाली आहे.
देशांतर्गत बाजारपेठेत काय स्थिती?
मल्टी कमोडिटी एक्सचेंज सारखंच देशांतर्गत बाजारपेठेत देखील सोने चांदीच्या दरात घट झाली आहे. या महिन्यात गेल्या १५ दिवसात सोने चांदीच्या दरात झालेल्या बदलांवर नजर टाकली तर IBJA.Com नुसार १५ ऑक्टोबरला २४ कॅरेट एक तोळा सोन्याचा दर हा १ लाख २६ हजार ७१४ रूपये होता. बुधवारच्या वाढीनंतर सोन्याचे दर हे १ लाख २० हजार ६२८ रूपये इतका होता. म्हणजे १५ दिवसाच्या कालावधीत देशांतर्गत बाजारपेठेत सोनं जवळपास ६ हजार ८४ रूपयांनी स्वस्त झालं आहे.
दुसरीकडं चांदीचा दर हा प्रती किलो १ लाख ७४ हजार पर्यंत पोहचला होता. आता तो १ लाख ४६ हजार पर्यंत कमी आला आहे. म्हणजे गेल्या १५ दिवसात चांदीच्या दरात २७ हजार ३६७ रूपयांची घट झाली आहे.
ट्रम्प - जिंगपिंगमध्ये डील झाली?
डोनाल्ड ट्रम्प आणि शी जिंगपिंग यांच्यात दक्षिण कोरियामध्ये बंद दाराआड जवळपास दोन तास चर्चा झाली. यावेळी अनेक मुद्द्यांवर चर्चा झाली. चीनवर युएसने लावलेला टॅरिफ कमी करण्याबाबत देखील सहमती झाली आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी चीनवरील टॅरिफ १० टक्क्यांनी कमी केला असून ५७ टक्क्यांवरून तो ४७ टक्क्यांवर आणण्यात येईल असं सांगितलं आहे. तसंच दोन्ही देशांनी रेअर अर्थ मिनरल्सचा देखील मुद्दा सोडवला आहे. दुसरीकडं चीननं अमेरिकेचा सोयाबीन त्वरित खरेदी करण्यास देखील होकार दिला आहे.

