

न्यूयॉर्क : संयुक्त राष्ट्रसंघाच्या ८० व्या महासभेत (UNGA) भाषण दिल्यानंतर फ्रेंच राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांना न्यूयॉर्क शहराच्या रस्त्यांवर अनपेक्षित विलंब सहन करावा लागला. २२ सप्टेंबर रोजी घडलेल्या या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड प्रमाणात व्हायरल होत आहे.
संयुक्त राष्ट्रसंघातील भाषणानंतर फ्रेंच दूतावासात परत जात असताना, फ्रेंच राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांना अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या ताफ्यासाठी न्यूयॉर्क पोलिसांनी अडवले. ट्रम्प यांच्या ताफ्यासाठी सर्व रस्ते बंद करण्यात आले होते. त्यामुळे मॅक्रॉन न्यूयॉर्कच्या रस्त्यांवर अडकले. बराचवेळ त्यांना गाडीत बसावे लागले. यामुळे त्रस्त झालेले फ्रेंच राष्ट्राध्यक्ष गाडीतून उतरले आणि रस्ता का बंद करण्यात आला आहे? याची विचारणा तिथे तैनात असलेल्या पोलिसांला केली. दोघांमध्ये संवाद झाला.
पॅलेस्टाईन राज्याला मान्यता देण्याची महत्त्वपूर्ण घोषणा करून मॅक्रॉन संयुक्त राष्ट्रांच्या मुख्यालयातून बाहेर पडले होते, तेव्हाच त्यांचा मार्ग अडवण्यात आला. फ्रेंच माध्यमांच्या वृत्तानुसार, डोनाल्ड ट्रम्प यांचा ताफा जवळ आल्याने न्यूयॉर्कमधील एका पोलीस अधिकाऱ्याने मॅक्रॉन यांना सांगितले, ‘क्षमस्व, राष्ट्राध्यक्ष महोदय यांचा ताफ्यासाठी सध्या सर्व मार्ग बंद आहेत.’
‘रॉयटर्स’ या वृत्तसंस्थेने या घटनेचा चित्रित केलेला व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या विलंबामुळे निर्माण झालेल्या हलक्या-फुलक्या वातावरणात फ्रेंच राष्ट्राध्यक्ष मॅक्रॉन यांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांना थेट फोन केला. त्यावेळी बॅरिकेडजवळ उभे राहून, न्यूयॉर्कमधील लोकांच्या गर्दीकडे पाहत मॅक्रॉन यांनी विनोदबुद्धीने ट्रम्प यांना मार्ग मोकळा करण्याची विनंती केली. फोनवर बोलताना त्यांनी ट्रम्प यांना ‘कसे आहात? अंदाज लावा सध्या माझ्यासोबत काय झाले आहे? मी रस्त्यावर थांबलो आहे, कारण तुमच्यासाठी सर्व मार्ग बंद करण्यात आले आहेत.’
दरम्यान, ट्रम्प यांचा ताफा निघून गेला आणि रस्ता फक्त पादचाऱ्यांसाठी खुला करण्यात आला. त्यानंतर फ्रेंच राष्ट्राध्यक्ष मॅक्रॉन पुन्हा गाडीत न बसता पायीच पुढे जाऊ लागले आणि फोनवर ट्रम्प यांच्यासोबत बोलत राहिले. न्यूयॉर्कच्या लोकांसाठी हे एक दुर्मिळ दृश्य होते, कारण फ्रेंच राष्ट्राध्यक्षासोबत असलेल्या नेहमीच्या सुरक्षा व्यवस्थेशिवाय ते रस्त्यावर फिरताना दिसले.
यादरम्यान मॅक्रॉन यांनी नागरिकांसोबत सेल्फी आणि फोटो काढण्याची विनंती स्वीकारली. 'ला देपेचे' (La Depeche) या वृत्तसंस्थेच्या वृत्तानुसार, एका व्यक्तीने फ्रेंच राष्ट्राध्यक्षांच्या कपाळावर चुंबन घेतल्याचेही दिसून आले.
यापूर्वी, मॅक्रॉन यांनी UNGA मध्ये जाहीर केले होते की फ्रान्सने पॅलेस्टाईनला एक राष्ट्र म्हणून अधिकृत मान्यता दिली आहे. इस्रायली आणि पॅलेस्टिनी यांच्यातील अनेक दशकांच्या संघर्षावर तोडगा काढण्यासाठी ‘द्वि-राष्ट्र उपायाला’ (two-state solution) पुन्हा चालना देण्याचे आवाहन त्यांनी केले. ‘आता शांततेची वेळ आली आहे आणि गाझामध्ये सुरू असलेले युद्ध कोणत्याही प्रकारे योग्य नाही,’ असे मॅक्रॉन म्हणाले. ऑस्ट्रेलिया, ब्रिटन, कॅनडा आणि पोर्तुगालनंतर फ्रान्सनेही हा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे.