

पुढारी ऑनलाईन डेस्क : वैवाहिक जीवनात लैंगिक संबंधांच्या भूमिकेबाबत फ्रेंच न्यायालयाने एक महत्त्वाची टिप्पणी केली आहे. एका फ्रेंच महिलेला तिच्या पतीसोबत 'शरीर संबंध' न ठेवल्यामुळे न्यायालयाने घटस्फोटासाठी दोषी ठरवले होते. याबद्दल तिने युरोपातील सर्वोच्च मानवाधिकार न्यायालयात अपील दाखल केले होते, ज्याचा निर्णय तिच्या बाजूने लागला. वैवाहिक जीवनात 'शरीर संबंध' ठेवणे हे वैवाहिक कर्तव्य नाही, अशी टीप्पणी न्यायालयाने सुनावणी दरम्यान केली.
सुश्री एच.डब्ल्यू. असे फ्रेंच महिलेचे नाव आहे. घटस्फोटानंतर फ्रान्समध्ये तिचे कायदेशीर सर्व पर्याय बंद झाले होते. शेवटी तिने २०२१ मध्ये युरोपियन मानवी हक्क न्यायालयात धाव घेतली. फ्रेंच न्यायालयांनी महिलेच्या खासगी आणि कौटुंबिक जीवनाचा आदर करण्याच्या अधिकाराचे उल्लंघन केल्याचे मानवाधिकार न्यायालयाने आपल्या निर्णयात म्हटले आहे. या प्रकरणात न्यायालय पती पत्नीमधील लैंगिक संबंधामध्ये हस्तक्षेप करण्याचे कोणतेही कारण ओळखू शकले नाही, असेही निवेदनात म्हटले आहे. आता न्यायालयाच्या या निर्णयामुळे फ्रान्समध्ये महिलांच्या हक्कांवर एक नवीन वादविवाद सुरू झाला आहे. लोक याबद्दल आपले मत व्यक्त करत आहेत.
फ्रेंच महिलेचा जन्म १९५५ मध्ये झाला. तिचे लग्न १९८४ मध्ये झाले होते. त्यांना ४ मुले झाल्यानंतर तिने पतीकडून घटस्फोटाची मागणी करण्यास सुरुवात केली. तथापि, तिला अजूनही असे वाटत होते की यासाठी स्वतःला दोष देणे चुकीचे आहे. तिने असा युक्तिवाद केला की, हा तिच्या खासगी आयुष्यात हस्तक्षेप आणि तिच्या शारीरिक इच्छांचं उल्लंघन आहे. महिलेने सांगितले की, २००४ पासून तिचे पतीसोबत शारीरिक संबंध ठेवलेले नाहीत. यासाठी तिने तिच्या आरोग्याच्या समस्या आणि पतीकडून होणारा हिंसाचार ही कारणे दिली. युरोपियन मानवी हक्क न्यायालयाने तिचा युक्तिवाद गांभीर्याने घेतला आणि तिच्या बाजूने निकाल दिला.