

इस्लामाबाद; वृत्तसंस्था : पाकिस्तानचे माजी लष्करप्रमुख कमर जावेद बाजवा यांचे वयाच्या 65 व्या वर्षी निधन झाले. फेब्रुवारी महिन्यात घरी बाथरूममध्ये घसरून पडल्यामुळे त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली होती. त्यानंतर त्यांच्यावर रावळपिंडी येथील लष्करी रुग्णालयात उपचार सुरू होते आणि ते अतिदक्षता विभागात (आयसीयू) होते.
डॉक्टरांनी त्यांच्यावर शस्त्रक्रिया केली होती; मात्र त्यांची प्रकृती गंभीरच राहिली आणि सतत वैद्यकीय देखरेखीखाली ठेवण्यात आले. अखेर उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. बाजवा हे 2016 ते 2022 या कालावधीत पाकिस्तानचे लष्करप्रमुख होते. माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्याशी झालेल्या वादामुळे बाजवा चर्चेत आले होते. 2018 मध्ये इम्रान खान सत्तेत आल्यानंतर 2021 मध्ये आयएसआय प्रमुखाच्या नियुक्तीवरून दोघांमध्ये मतभेद निर्माण झाले होते. यानंतर 2022 मध्ये इम्रान खान यांचे सरकार कोसळले. निवृत्तीनंतर बाजवा यांच्या कुटुंबाच्या संपत्तीवाढीवरूनही मोठा वाद निर्माण झाला होता. केवळ सहा वर्षांत त्यांच्या कुटुंबाची संपत्ती झपाट्याने वाढून कोट्यवधी रुपयांवर पोहोचली होती.