पुढारी ऑनलाईन डेस्क : जगातील सर्वात महागडी आणि अलिशान कार अशी ओळख असणार्या रोल्स रॉयसचे माजी प्रमुख डिझायनर इयान कॅमेरॉन यांची जर्मनीतील बंगल्यात चाकूने भोसकून हत्या करण्यात आली. हल्लेखोरांनी हल्ला केला त्यावेळी इयान यांच्या पत्नी वेरना क्लॉस यांनी बंगल्याच्या भिंतीवरुन उडी मारुन आपला जीव वाचवला. या घटनेमुळे आम्हाला धक्का बसला आहे. आम्ही त्यांच्या कुटुंबीयांसोबत आहोत, असे निवेदन 'रोल्स रॉइसने प्रसिद्ध केले आहे.
'द सन'ने दिलेल्या वृत्तानुसार, इयान कॅमेरॉन यांचा जर्मनीतील हेरशिंगमधील लेक ॲमरसी परिसरात तब्बल तीन दशलक्ष डॉलरचा अलिशान बंगला आहे. येथे ते आपल्या पत्नीसमवेत राहात होते. १२ जुलै रोजी दरोडखोराने त्यांना चाकूने भोसकले. त्यावेळी त्यांच्या पत्नीने बंगल्याच्या भिंतीवरुन उडी मारुन शेजारच्या घरी पळून गेल्या. त्यांनी पोलिसांना या घटनेची माहिती दिली. हल्लेखोराचा शोध सुरु आहे. सीसीटीव्ही फुटेजवरून असे दिसून आले की, हल्ल्यापूर्वी इयान कॅमेरॉन यांच्या गॅरेजमधील सीसीटीव्हीच्या केबल बंद होता. यावरुन हा पूर्वनियोजित कट असावा,असा संशयही स्थानिक पोलिसांनी व्यक्त केला आहे.
१९९८ मध्ये जगविख्यात कार कंपनी BMW ने 'रोल्स रॉयस' ही कंपनी विकत घेतली. यानंतर इयान कॅमेरॉन यांनी 'रोल्स रॉयस'च्या डिझाइन टीमचे नेत्तृत्त्व केले. २० वर्षांच्या आपल्या सेवेत त्यांनी तब्बल १३ वर्ष त्यांनी प्रमुख डिझाइनर म्हणून काम पाहिले. घोस्ट, फँटम फॅमिली , 3 सीरीज आणि Z8 सारख्या मॉडेल्सच्या डिझाईनमध्ये इयान कॅमेरॉन यांचे मोठे योगदान होते. समकालीन मोटार कारमध्ये कॅमेरॉन यांनी रोल्स रॉयससाठी केलेल्या डिझायन जगभरातील ग्राहकांच्या पसंतीस उतरल्या होत्या.