Flydubai co-pilot | होय, मला विमान पाडायचे होते! फ्लायदुबईचा सहवैमानिक हम्माम अल-हम्मामीची कबुली

Flydubai co-pilot |
Flydubai co-pilot | होय, मला विमान पाडायचे होते! फ्लायदुबईचा सहवैमानिक हम्माम अल-हम्मामीची कबुली
Published on: 
Updated on: 

अबुधाबी; वृत्तसंस्था : मला हे विमान जाणीवपूर्वक पाडायचे होते आणि मला मरणाची कोणतीही भीती वाटत नव्हती, अशी कबुली फ्लायदुबईचे विमान जाणीवपूर्वक पाडण्याचा प्रयत्न करणारा ओमानी सहवैमानिक हम्माम अल-हम्मामी याने दिली. एका आंतरराष्ट्रीय वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, विमानाचे सौदी अरेबियात आणीबाणीच्या परिस्थितीत यशस्वी लँडिंग झाल्यानंतर त्याला संयुक्त अरब अमिरातीच्या सुरक्षा पथकाने ताब्यात घेतले आहे. हम्माम अल-हम्मामीने तपास अधिकाऱ्यांसमोर दिलेली आत्मघातकी कबुली त्याच्या भूतकाळातील सोशल मीडिया पोस्ट्सच्या अगदी उलट आहे. जून २०२२ मधील एका अरबी पोस्टमध्ये त्याने वैमानिक प्रशिक्षणाबद्दल अतिशय जिव्हाळा व्यक्त केला होता. पहिल्यांदा एकट्याने विमान उडवणे किंवा प्रवाशांसह विमानाचे सुरक्षित लँडिंग करणे हे क्षण कधीही न विसरता येण्याजोगे असतात, असे त्याने लिहिले होते. एका निष्णात वैमानिकाचे असे अचानक कट्टरतावादाकडे वळणे तपास यंत्रणांसाठी मोठे कोडे ठरले आहे.

कट्टर विचारांमुळे आधीच्या नोकरीतून हकालपट्टी

तपासातून निष्पन्न झालेल्या माहितीनुसार, हम्माम अल-हम्मामी तीव्र कट्टरतावादी विचारसरणीचा पुरस्कर्ता होता. पुरुष आणि महिलांनी एकत्र काम करण्याच्या संस्कृतीवर त्याने सोशल मीडियावर जाहीर टीका केली होती. स्त्री-पुरुष एकत्र काम करण्याच्या वातावरणामुळे कितीतरी सुसंस्कृत मुलींचे जीवन उद्ध्वस्त झाले आहे, अशा आशयाची पोस्ट त्याने जानेवारी २०२२ मध्ये केली होती. लग्नासाठी केवळ बुरखा परिधान करणारी आणि नोकरी न करणारी मुलगी हवी, अशा अटी घालणारा हम्माम या विकृत मानसिकतेमुळेच ओमानच्या राष्ट्रीय विमान कंपनीतून बडतर्फ झाला होता.

सीरिया कनेक्शन

२९ वर्षीय हम्मामचे वडील ओमानी तर आई सीरियन वंशाची असून तो दुबईत वास्तव्य करत होता. सीरियातील दीर्घ गृहयुद्धाच्या काळात तो काही काळ तिथे राहिला होता. त्या काळात इस्रायलविरोधी कारवाया आणि इस्लामिक बंडखोरांच्या प्रभावामुळे त्याच्यात कट्टरतावादी विचारांची पाळेमुळे रुजली असावीत, असा तपास यंत्रणांचा अंदाज आहे.

नेतान्याहू यांनी केली फोनवरून मच्छार यांची विचारपूस

अबुधाबी : फ्लायदुबईच्या विमानामध्ये सहवैमानिकाने केलेल्या भीषण हल्ल्यातून थोडक्यात बचावलेले भारतीय पायलट कॅप्टन स्मित मच्छार यांनी कॉकपिटमधील थरारक घटनाक्रमाचा उलगडा केला आहे. गंभीर जखमी अवस्थेतही जीवाची पर्वा न करता त्यांनी कॉकपिटचे दार उघडल्याने १७४ प्रवाशांचे प्राण वाचले. इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांच्याशी फोनवर संवाद साधताना त्यांनी हा थरार विशद केला. कॅप्टन स्मित मच्छार यांना नेतान्याहू म्हणाले, तुम्ही जगाचे हिरो आहात. तुम्ही इस्रायलवरील हल्ला प्राणाची बाजी लावून परतवला आहे. तुम्ही आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इस्रायलच्या स्वातंत्र्यदिनाला प्रमुख पाहूणे म्हणून उपस्थित राहावे.

फ्लायदुबई कर्मचाऱ्यांनी केली सहवैमानिकाला सोडण्याची मागणी

वॉशिंग्टन : दुबईहून तेल अवीवला जाणाऱ्या फ्लायदुबईच्या विमानात हवेतच सहवैमानिकाने मुख्य वैमानिकावर प्राणघातक हल्ला केल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. या हल्लेखोर सहवैमानिकाला प्रवाशांनी शर्थीचे प्रयत्न करून बांधून ठेवल्यानंतर विमानातील क्रू मेंबर्सनी प्रवाशांना त्याला सोडण्यास सांगितले, असा धक्कादायक दावा प्रत्यक्षदर्शी प्रवाशांनी केला आहे. विमानात ओमानचा सहवैमानिक हम्माम अल-हम्मामी याने भारतीय मुख्य पायलट कॅप्टन स्मित मच्छार यांच्यावर कुऱ्हाडीने (क्रॅश ॲक्स) अचानक हल्ला चढवला. गंभीर जखमी अवस्थेतही कॅप्टन मच्छार यांनी प्रसंगावधान राखत कॉकपिटचे दार उघडले. त्यामुळे त्झविका मानेझ, यानिव्ह हायून आणि असफ राजुआन या तीन इस्रायली प्रवाशांनी तातडीने आत धाव घेत हल्लेखोर सहवैमानिकाला खाली पाडले आणि झिप-टाय व हेडफोनच्या तारांनी घट्ट बांधून ठेवले.

दहशतवादी सहवैमानिकाचे ऑस्ट्रेलियन कनेक्शन उघड

सिडनी/दुबई : इस्रायलमधील तेल अवीवकडे जाणाऱ्या ‘फ्लायदुबई’ विमानाचे हवेतच अपहरण करण्याचा प्रयत्न करणाऱ्या सहवैमानिकाचे धागेदोरे आता ऑस्ट्रेलियाशी जोडले गेले आहेत. हा संशयित सहवैमानिक पूर्वी दोन वर्षे ऑस्ट्रेलियामध्ये विद्यार्थी म्हणून वास्तव्यास असल्याची माहिती समोर आल्यानंतर ऑस्ट्रेलियन सुरक्षा यंत्रणांनी या प्रकरणाचा सखोल तपास सुरू केला आहे. ऑस्ट्रेलियन फेडरल पोलिस, व्हिक्टोरिया पोलिस आणि गुप्तचर संस्था ॲसिओ यांच्या संयुक्त दहशतवाद विरोधी पथकाने या प्रकरणाची चौकशी सुरू केली आहे. तो ऑस्ट्रेलियात असताना कोणाच्या संपर्कात होता याचा शोध घेतला जात आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news