

अनिल टाकळकर
वॉशिंग्टन डी. सी. : अमेरिकेचे तंत्रज्ञान क्षेत्रातील दिग्गज उद्योजक एलन मस्क पुन्हा डोनाल्ड ट्रम्प यांची मर्जी संपादन करण्यात यशस्वी झाले असून आता ते ट्रम्प सरकारसाठी औपचारिकरीत्या पुन्हा एक नवी कामगिरी करण्यास सज्ज झाले आहेत. भविष्यातील युद्ध कशा पद्धतीने लढले जाईल, याबाबत त्यांनी गेल्या काही वर्षांत मांडलेल्या कल्पनांना आता प्रत्यक्ष संरक्षण धोरणाचा भाग बनवण्याची संधी त्यांना या नव्या जबाबदारीमुळे मिळणार आहे.
सरकारने केलेल्या घोषणेनुसार ‘पेंटागॉन’च्या ‘प्रोजेक्ट मेरिडियन’मध्ये मस्क यांची सह-संचालक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. स्वायत्त ड्रोन, रोबोटिक्स, कृत्रिम बुद्धिमत्ता आणि हायपरसॉनिक शस्त्रास्त्रांवर आधारित भविष्यातील युद्धव्यवस्थेचा अभ्यास करण्याची जबाबदारी त्यांच्यावर असेल.
मस्क यांनी यापूर्वीच, भविष्यातील युद्धे ही ड्रोन आणि हायपरसॉनिक क्षेपणास्त्रांबाबत असतील, असे मत व्यक्त केले आहे. आता ‘पेंटागॉन’च्या नव्या उपक्रमांमधून या दृष्टिकोनाचा प्रत्यक्ष लष्करी धोरणात कितपत वापर करता येईल, याचा अभ्यास केला जाणार आहे. मस्क यांच्यासोबत संरक्षण क्षेत्रातील स्टार्ट-अप अँडुरिलचे संस्थापक पाल्मर लकी आणि माजी हाऊस स्पीकर न्यूट गिंगरिच हे ‘प्रोजेक्ट मेरिडियन’मध्ये सहभागी असतील. ‘पेंटागॉन’चे मुख्य तंत्रज्ञान अधिकारी एमिल मायकेल यांच्यासोबत ते भविष्यातील युद्धभूमीचा अभ्यास करतील. या अभ्यासाचे निष्कर्ष १२० दिवसांत सादर होणार आहेत.
शांतता काळातील वेगवान बदल
संरक्षणमंत्री पीट हेगसेठ यांच्या निवेदनानुसार, स्वायत्त युद्धासाठी चार-तारांकित लष्करी कमांड स्थापनेच्या माध्यमातून पेंटागॉनकडून ड्रोन आणि अन्य अत्याधुनिक तंत्रज्ञानाची खरेदी, त्यांची चाचणी आणि युद्धभूमीवर तैनाती करण्याच्या पद्धतीत मोठा बदल केला जाणार आहे.
“आधुनिक लष्करी इतिहासातील शांततेच्या काळातील सर्वांत वेगवान बदल” या स्वरूपात ही प्रक्रिया केली जाईल, असे हेगसेठ यांनी बुधवारी व्हर्जिनियातील यूएस मरीन कॉर्प्स बेस क्वांटिको येथे भाषण करताना सांगितले. ही नवी कमांड ऑक्टोबर २०२७ मध्ये कार्यान्वित होणार आहे. त्यांच्या निवेदनानुसार उद्योजक एलॉन मस्क आणि पाल्मर लकी, तसेच रिपब्लिकन पक्षाचे माजी हाऊस स्पीकर न्यूट गिंगरिच, युद्धाच्या भविष्याचा अभ्यास करतील.‘प्रोजेक्ट मेरिडियन’चे नेतृत्व पेंटागॉनकडून केले जाईल.
ऑटोनॉमस वॉरफेअर कमांड वर्षभरात कार्यरत
संरक्षणमंत्री पीट हेगसेथ स्वायत्त युद्धासाठी स्वतंत्र चार-तारांकित ‘ऑटोनॉमस वॉरफेअर कमांड’ स्थापन करीत आहेत. ‘ऑटॉवॉरकॉम’ या नावाने ओळखली जाणारी ही कमांड ड्रोन, रोबोटिक्स आणि अन्य मानवरहित यंत्रणांची खरेदी, चाचणी आणि युद्धभूमीवर तैनाती अधिक वेगाने करण्यासाठी काम करणार आहे. ही कमांड ऑक्टोबर २०२७ मध्ये कार्यान्वित होण्याची अपेक्षा आहे.