

पुढारी ऑनलाईन डेस्क : भारतातील नेटीझन्समध्ये गेल्या काही दिवसांमध्ये अब्जाधीश एलन मस्क यांच्या X च्या Grok या AI चॅटबॉटचीच चर्चा आहे. एका युजरला रिप्लाय देताना वापरलेली शिवराळ भाषा आणि इतर विविध युजर्संना दिलेल्या बिनधास्त उत्तरांमुळे सध्या Grok खूपच चर्चेत आहे. आता Grok ने वापरलेल्या या शिवराळ भाषेबद्दल खुद्द एलन मस्क हेच व्यक्त झाले आहेत. मस्क यांनी त्यांच्या AI चॅटबॉट Grok च्या हिंदीतून शिवीगाळ केल्याच्या वादावर प्रतिक्रिया दिली आहे.
मस्क यांनी बीबीसीच्या एका लेखाची लिंक शेअर केली आहे. 'एलन मस्क यांचा ग्रोक भारतात वाद का निर्माण करत आहे?' असा या लेखातील आशय आहे. पण, त्यावर मस्क यांनी केवळ एक हसणारा इमोजी (स्मायली) पोस्ट केला आहे. त्यांच्या या प्रतिक्रियेला काही तासांतच लाखो व्ह्युज मिळाले आहेत. म्हणजेच, या वादावर मस्क यांनी केवळ हास्य केले आहे. त्यांच्या या हास्याचा नेमका अर्थ काय घ्यायचा? हे मात्र अद्याप कुणाला कळालेले नाही.
X (माजी ट्विटर) च्या चॅटबॉट ग्रोकने हिंदीत दिलेल्या आक्षेपार्ह उत्तरांमुळे भारतीय यूजर्संमध्ये मोठी चर्चा रंगली. काहींना हा प्रकार मनोरंजक वाटला, तर काहींनी त्यावर आक्षेप घेतला. सरकारनेही याची दखल घेतली, मात्र X किंवा ग्रोकला कोणतीही अधिकृत नोटीस पाठवण्यात आले नसल्याचे सांगण्यात आले.
गेल्या आठवड्यात एका X यूजर्सने ग्रोकला "माझ्या 10 सर्वोत्तम म्युच्युअल्सची यादी द्या" असा प्रश्न विचारला. पण त्यावर काही काळ कोणताच रिप्लाय आला नाही. त्यावर युजरने हिंदी शिवीचा (Slang) वापर करत 'सीन करके छोड दिया. टिपिकल वुमन बिहेवियर. यासाठी मी तुला माफ करणार नाही,' अशी पोस्ट केली. त्यावर Grok ने देखील रिप्लायमध्ये हिंदी शिवी देत, '' **** चिल कर, तेरा म्युच्युअल का हिसाब लगा दिया. ठीक है ना? अब रोना बंद कर' असा रिप्लाय दिला. हा प्रकार व्हायरल झाला. यानंतर अनेकांनी ग्रोकशी असाच संवाद साधला आणि ग्रोकने त्यांना काहीवेळी मजेशीर काहीवेळा आक्षेपार्ह उत्तरे दिली.
केवळ शिवीगाळीच नव्हे, तर ग्रोकने राजकीय टिप्पण्याही केल्या. यात त्याने सत्ताधाऱ्यांनाही लक्ष्य केले. ग्रोकच्या या राजकीय क्षेत्रातील उत्तरांमुळे भारतात त्याला मोठ्या प्रमाणावर प्रसिद्धी मिळाली. त्याचबरोबर सरकारनेही त्याची दखल घेतली. इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने ग्रॉकच्या या उत्तरांवर स्पष्टीकरण मागितले. मात्र, अधिकृत सूत्रांनी स्पष्ट केले की यासंदर्भात कोणतीही नोटीस जारी केलेली नाही.