

पुढारी ऑनलाईन डेस्क : सध्याचे युग हे AI चे म्हणजेच आर्टिफिशियल इंटेलिजन्स (कृत्रिम बुद्धिमत्ता) चे आहे, असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. सध्या विविध क्षेत्रात AI कशाप्रकारे लाभदायी ठरू शकते याचे प्रयोग होत आहेत. असाच एक प्रयोग इटलीतील वृत्तपत्रसृष्टीत केला गेला. इटलीतील ‘इल फोगलिओ’ ( ‘IL Foglio’) या दैनिकाने पूर्णतः AI द्वारे वृत्तपत्राची निर्मिती केली आहे. ‘IL Foglio’ या दैनिकाने पत्रकारितेवरील कृत्रिम बुद्धिमत्तेच्या (AI) प्रभावावर प्रकाश टाकण्यासाठी संपूर्णपणे AI-निर्मित वृत्तपत्र प्रकाशित करण्याचा एक महिना चालणारा प्रयोग सुरू केला आहे. (Italy's IL Foglio publishes first fully AI-generated newspaper)
एकीकडे आज जगभरातील मीडिया हाऊसेस AI प्लॅटफॉर्मवर त्यांच्या मजकुराचा विनापरवानगी वापर केल्याबद्दल आक्षेप घेत असताना, ‘IL Foglio’ ने पूर्णपणे AI-निर्मित वृत्तपत्र प्रकाशित करून इतिहास घडवल्याचा दावा केला आहे. ‘IL Foglio’ हे संरक्षणवादी राजकीय आणि आर्थिकदृष्ट्या उदारमतवादी वृत्तपत्र आहे. या दैनिकाची चार पानांची AI-निर्मित आवृत्ती मंगळवारपासून न्यूजस्टँड आणि ऑनलाईन उपलब्ध झाली आहे, The Guardian ने याबाबतचे वृत्त दिले आहे.
‘Il Foglio’ चे संपादक क्लॉडिओ सेरासा यांनी स्पष्ट केले की, या विशेष आवृत्तीत सर्व लेख, मथळे, उतारे आणि बातम्या AI ने तयार केले आहेत. संपूर्ण लेखन, हेडलाईन तयार करणे, प्रतिक्रिया, सारांश आणि काही ठिकाणी उपरोधिक भाष्यसुद्धा AI नेच केले आहे. या प्रयोगात पत्रकारांची भूमिका केवळ AI ला प्रश्न विचारणे आणि त्याची उत्तरे वाचणे इतकीच मर्यादित असेल.”
या पहिल्याच AI-निर्मित वृत्तपत्राच्या आवृत्तीत अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प, रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन आणि इटलीच्या अर्थव्यवस्थेवर आधारित लेख आहेत. लेख स्पष्ट, चांगल्या रचनेचे आणि व्याकरणदोषमुक्त आहेत. मात्र, कोणत्याही लेखात व्यक्तींच्या प्रतिक्रिया नाहीत. पान 2 वर युरोपातील तरुण स्थिर नातेसंबंध टाळत असल्याबाबतचा लेख आहे. अखेरच्या पानावर वाचकांनी संपादकाला पाठवलेल्या AI-निर्मित पत्रांचा समावेश आहे. विशेष म्हणजे, यातील एका पत्रात विचारले आहे की, “AI मुळे मनुष्य निरुपयोगी ठरेल का?” त्यावर AI नेच दिलेले उत्तर आहे की, “AI एक मोठी नवकल्पना आहे, पण त्याला अजूनही साखर न चुकवता कॉफी ऑर्डर करणे जमत नाही.”
‘IL Foglio’ चा अर्थ “द पेपर/शीट.” या नावाच्या इटालियन वृत्तपत्राची सुरवात 1996 मध्ये ज्युलियानो फेरारा यांनी केली. फेररा हे एक पत्रकार, टीव्ही अँकर आणि राजकारणी होते. 2015 पासून क्लॉडिओ सेरासा हे ‘Il Foglio’ चे संपादक आहेत. सेरासा यांनी स्पष्ट केले की, “हा AI प्रयोग पत्रकारितेत AI कसे कार्य करू शकते याचे प्रात्यक्षिक आहे.