वॉशिंग्टन : जो बायडेन आणि कमला हॅरिस यांच्या धोरणांमुळे देशात 100 वर्षांत सर्वाधिक महागाई झाली आहे. इतर देशांतील गुन्हेगार अमेरिकेत दाखल होत आहेत. कमला राष्ट्राध्यक्ष बनल्या, तर अमेरिका पूर्णपणे उद्ध्वस्त होईल, असा इशारा माजी राष्ट्राध्यक्ष तसेच आगामी निवडणुकीत राष्ट्राध्यक्षपदासाठीचे रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार डोनाल्ड ट्रम्प यांनी दिला.
अमेरिकन उद्योगपती तसेच टेस्ला समूहाचे अध्यक्ष एलन मस्क यांनी मंगळवारी एक्स स्पेसवर ट्रम्प यांची मुलाखत घेतली. ऑडिओ स्वरूपात हे संभाषण दोन तास चालले. पेन्सिल्व्हेनियामध्ये ट्रम्प यांच्यावर झालेल्या गोळीबाराबद्दल मस्क यांनी पहिला प्रश्न विचारला. त्यावर या हल्ल्यातून मी बचावल्यानंतर माझा देवावरील, दैवावरील विश्वास बळावला आहे, असे उत्तर ट्रम्प यांनी दिले.
रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन आणि उत्तर कोरियाचे अध्यक्ष किम जोंग यांच्याबाबत नरमाईची नव्हे, पण अगदीच शत्रुत्वाचीही भूमिका नाही. पुतीन यांनी युक्रेनवरील हल्ले थांबविले नाहीत, तर मी हे सहन मात्र करणार नाही, असे ट्रम्प यांनी स्पष्ट केले. युक्रेन-रशिया आणि इस्रायल-पॅलेस्टाईनमधील युद्धाला बायडेन जबाबदार आहेत, असा आरोपही त्यांनी केला. मी राष्ट्राध्यक्ष असतो, तर इराणला हिजबुल्ला आणि हमासला मदत करण्याची हिंमतच झाली नसती, असेही ते म्हणाले. अमेरिकेत 2 कोटी अवैध स्थलांतरित आहेत. इतर देशांतून ड्रग्ज विक्रेतेही येथे येत आहेत. सगळेच स्थलांतरित वाईट आहेत, असेही नाही, हेही ट्रम्प यांनी मान्य केले.