Gadi Eisenkot | तुम्ही हरलात; तुमच्या खेळीला बळी पडणार नाही!

आयझेनकोट यांनी फेटाळला नेतान्याहूंचा एकत्र सत्ता स्थापनेचा प्रस्ताव
Gadi Eisenkot |
Gadi Eisenkot | तुम्ही हरलात; तुमच्या खेळीला बळी पडणार नाही!
Published on: 
Updated on: 

तेल अवीव; वृत्तसंस्था : इस्रायलचे कार्यवाहक पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी माजी लष्करप्रमुख गादी आयझेनकोट यांना एकत्र येऊन राष्ट्रीय एकता सरकार स्थापन करण्याची विनंती केली. मात्र, आयझेनकोट यांनी काही मिनिटांतच हा प्रस्ताव फेटाळून लावला. ‘नेतान्याहू यांना माहिती आहे की, ते निवडणूक हरले आहेत. अशावेळी ते चर्चेचे आवाहन करत आहेत. त्यांच्या राजकीय खेळीला मी बळी पडणार नाही,’ असे प्रत्युत्तर त्यांनी दिले.

नेतान्याहू यांनी शनिवारी व्हिडीओ संदेशाद्वारे देशाच्या सुरक्षेचा मुद्दा उपस्थित केला. इराण पुन्हा अणुकार्यक्रम सुरू करण्याच्या प्रयत्नात असून, इस्रायलसमोर गंभीर धोका निर्माण झाला आहे. या धोक्याचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्यासाठी देशातील प्रमुख राजकीय पक्षांनी एकत्र येणे आवश्यक आहे. लहान पक्षांच्या किंवा दहशतवादाला पाठिंबा देणाऱ्या पक्षांच्या मदतीने स्थापन होणारे सरकार देशाचे संरक्षण करू शकणार नाही.

नेतान्याहू यांच्या आघाडीला ५३, तर आयझेनकोट यांच्या चार पक्षांच्या आघाडीला ४८ जागा मिळाल्या. अरब पक्षांनी १९ जागा जिंकल्या. राष्ट्राध्यक्ष हर्झोग यांनी खासदारांची मते विचारात घेतल्यानंतर ६७ खासदारांनी आयझेनकोट यांना पाठिंबा दिला. त्यामुळे आयझेनकोट यांच्यावर सरकार स्थापनेची जबाबदारी सोपवली आहे. आयझेनकोट यांच्या योजनेनुसार, ४८ खासदार सरकारच्या बाजूने मतदान करतील, तर नेतान्याहू यांच्या ४६ खासदारांकडून विरोध होईल. अरब पक्षांनी मतदानापासून दूर राहावे, अशी त्यांची भूमिका आहे.

उद्या संसदेच्या अध्यक्षपदाची निवडणूक

मंगळवारी नेसेटच्या अध्यक्षपदाची निवडणूक होणार आहे. या निवडणुकीकडेही सत्तास्थापनेच्या दृष्टीने महत्त्वाची घडामोड म्हणून पाहिले जात आहे. इस्रायलमध्ये नव्या सरकारचे भवितव्य आगामी काही दिवसांत स्पष्ट होण्याची शक्यता आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.