
Afghanistan earthquake
काबूल : अफगाणिस्तानच्या पश्चिम भागात आज (दि. २०) पहाटे भूकंपाचा धक्का बसला. नॅशनल सेंटर फॉर सिस्मोलॉजीनुसार, या भूकंपाची तीव्रता ४.६ रिश्टर स्केल होती. भारतीय वेळेनुसार सकाळी ६ वाजून ११ मिनिटांनी हा भूकंप झाला.
भूकंपाचा केंद्रबिंदू ३४.८९ उत्तर अक्षांश आणि ६२.५४ पूर्व रेखांश येथे जमिनीखाली ५० किलोमीटर खोलीवर होता. या भूकंपामुळे कोणतीही जीवितहानी किंवा मालमत्तेचे नुकसान झाल्याची माहिती अद्यापपर्यंत मिळालेली नाही.
यापूर्वी, १९ एप्रिल रोजी अफगाणिस्तान-ताजिकिस्तान सीमावर्ती भागात ५.८ रिश्टर स्केलचा भूकंप झाला होता. त्याचे धक्के उत्तर भारतातील काही भागांत, काश्मीर आणि दिल्ली-एनसीआरपर्यंत जाणवले होते. नॅशनल सेंटर फॉर सिस्मोलॉजी (एनसीएस) नुसार, त्याचा केंद्रबिंदू जमिनीखाली ८६ किलोमीटर खोलीवर होता. भूकंपाचा केंद्रबिंदू अफगाणिस्तान-ताजिकिस्तान सीमावर्ती भागात होता, जो भूपट्ट्यांच्या हालचालींमुळे भूकंपासाठी संवेदनशील क्षेत्र आहे.
पृथ्वीचा बाह्य पृष्ठभाग शांत आणि स्थिर वाटतो, पण तिच्या आत मात्र सातत्याने हालचाल सुरू असते. ही हालचाल आपल्या डोळ्यांना दिसत नाही, पण तिचे परिणाम मात्र मोठे असतात. भूगर्भशास्त्रज्ञ सांगतात की, पृथ्वी १२ मोठ्या टेक्टोनिक प्लेट्सवर उभी आहे. या प्लेट्स म्हणजे पृथ्वीखालील मोठे खडकांचे भाग, जे एकमेकांना लागून आहेत आणि सतत हालचाल करतात. या प्लेट्स एकमेकांपासून दरवर्षी ४ ते ५ मिमीने हलतात. काही वेळा या प्लेट्स एकमेकीपासून दूर सरकतात, काही वेळा एकमेकांवर आदळतात, तर कधी एक प्लेट दुसऱ्याच्या खाली शिरते. जेव्हा या प्लेट्स एकमेकांना जोरात धडकतात, तेव्हा त्या धडकेमुळे पृथ्वीच्या आत मोठी ऊर्जा तयार होते. ही ऊर्जा लहरींच्या स्वरूपात बाहेर पडते, आणि यालाच भूकंप म्हणतात.