पुढारी ऑनलाईन डेस्क
पाकिस्तानमधून (Pakistan) एका धक्कादायक घटना समोर आली आहे. पाकिस्तानातील कराचीतील एक मॉल उद्घाटनादिवशीच लोकांनी लुटला. या घटनेचे व्हिडिओ सोशल मीडियावर (Dream Bazaar Mall Viral Video) व्हायरल झाले आहेत. पाकिस्तान मीडिया रिपोर्ट्सनुसार, मॉलने उद्घाटनादिवशीच स्पेशल डिस्काऊंट जाहीर केला होता. यामुळे मॉल बाहेर हजारोंच्या संख्येने लोक जमा झाले. त्याचबरोबर काही लोक काठ्या घेऊन मॉलमध्ये घुसले आणि त्यांनी मॉलमधील वस्तू लुटल्या. यामुळे गोंधळ उडाला.
कराचीतील गुलिस्तान -ए- जौहर येथे खुल्या झालेल्या नव्या मॉलचे नाव ड्रीम बझार (Dream Bazaar Mall) असे आहे. या मॉलच्या उद्घाटनादिवशी म्हणजे १ सप्टेंबर रोजी जाहीर केलेल्या स्पेशल डिस्काऊंट ऑफरचा लाभ घेण्यासाठी हजारोंच्या संख्येने लोकांनी मॉलबाहेर गर्दी केली. दुपारी ३ वाजता मॉल खुला होताच हजारो लोक मॉलमध्ये घुसले. या मॉलच्या उद्घाटनादिवशीच जमावाने त्यावर हल्ला केला आणि साहित्यांची लूट करत आतील मालमत्तेची तोडफोड केली. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओंत मॉलमधून लोक वस्तू घेऊन जाताना दिसतात. मॉलमधील कर्मचाऱ्यांना असहाय्य होऊन वस्तू घेऊन जाणाऱ्या लोकांना केवळ पाहावे लागले.
मॉलच्या स्टोअरमधील कपडे, वस्तू सर्वत्र विखुरलेल्या होत्या. तर लोकांनी मिळेल ते घेतले. काहींनी ड्रीम बझार मॉलमधून वस्तू लुटताना स्वतःचे रेकॉर्डिंगही केले. मॉलच्या उद्घाटनाचा कार्यक्रम बेशिस्त जमावाने उधळून लावला आणि मालमत्तेचेही मोठ्या प्रमाणात नुकसान केले.
ARY News या पाकिस्तानी वृत्तवाहिनीने प्रत्यक्षदर्शींच्या हवाल्याने दिलेल्या वृत्तात म्हटले आहे की, येथील गोंधळाच्या पार्श्वभूमीवर पोलीस अधिकारी मॉलमध्ये उपस्थित नव्हते. एका व्हिडिओत एका कर्मचाऱ्याने मॉलच्या उद्गघानादिवशी लोकांनी घातलेल्या गोंधळाबद्दल नाराजी व्यक्त केली. “पाहा मॉलची अवस्था काय झाली आहे?, आम्ही हे लोकांच्या हितासाठी करत आहोत आणि जोपर्यंत त्यांना हे समजून येत नाही तोपर्यंत परिस्थिती सुधारणार नाही,” असे तो म्हणाला.