Rajnath Singh| दहशतवादाविरुद्ध दुटप्पी भूमिका खपवून घेणार नाही

‘एससीओ’ बैठकीत राजनाथ सिंह यांचा पाकिस्तानच्या उपपंतप्रधानांसमोर थेट इशारा
Rajnath Singh
Rajnath Singhfile photo
Published on: 
Updated on: 

दुशान्बे : दहशतवाद केवळ निष्पाप नागरिकांचा बळी घेत नाही, तर गुंतवणूक आणि व्यापारावरही गंभीर परिणाम करतो. यामुळे समाजाचे कट्टरतावादीकरण होते आणि तरुणांना विकासाच्या संधींपासून वंचित राहावे लागते, अशा शब्दांत संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी पाकिस्तानला खडे बोल सुनावले. ताजिकिस्तानची राजधानी दुशान्बे येथे आयोजित शांघाय सहकार्य संघटनेच्या सरकारप्रमुखांच्या बैठकीत ते बोलत होते. पाकिस्तानचे उपपंतप्रधान इशाक दार यांच्या उपस्थितीत त्यांनी दहशतवादाचा मुद्दा ठामपणे मांडला.

दहशतवादाचे कोणत्याही कारणास्तव समर्थन केले जाऊ शकत नाही. दहशतवादाचा सामना करताना कोणतेही दुटप्पी निकष असता कामा नयेत. जे दहशतवाद्यांना आर्थिक रसद पुरवतात, मदत करतात किंवा त्यांना सुरक्षित आश्रय देतात, त्यांच्यासाठी जगात स्थान नाही. दहशतवादाची ही संपूर्ण यंत्रणा सामूहिक प्रयत्नांनी मुळापासून नष्ट केली पाहिजे, असा इशाराही त्यांनी दिला.

शांततेची कटिबद्धता कमजोरी नाही

सीमेपलीकडून होणाऱ्या दहशतवादावर भाष्य करताना त्यांनी भारताच्या भूमिकेचा पुनरुच्चार केला. पाकिस्तानकडून कोणत्याही दहशतवादी कारवाया झाल्यास त्याला आणखी जोरदार प्रत्युत्तर दिले जाईल, असा इशारा त्यांनी नुकताच दिला होता. भारतीय संस्कृती संवाद, सहअस्तित्व आणि शांततापूर्ण मार्गाने वाद सोडवण्यावर विश्वास ठेवते, मात्र शांततेप्रती असलेली ही कटिबद्धता कोणीही कमजोरी समजू नये. ऑपरेशन सिंदूर, बालाकोट एअरस्ट्राईक आणि सर्जिकल स्ट्राईक या केवळ लष्करी कारवाया नसून मुळावर घाव घालणाऱ्या भारताच्या आक्रमक दृष्टिकोनाचे प्रतीक आहेत. २०१४ नंतर सुरक्षा दलांनी सक्रियता दाखवल्यामुळे दहशतवाद्यांचे अस्तित्व एक वर्षापेक्षा कमी कालावधीत संपुष्टात येत आहे.

द्विपक्षीय बैठका आणि प्रादेशिक सहकार्य

या शिखर परिषदेच्या पार्श्वभूमीवर राजनाथ सिंह यांनी ताजिकिस्तानचे पंतप्रधान कोहिर रोसुलझोदा आणि इराणचे पहिले उपराष्ट्रपती मोहम्मद रझा आरेफ यांच्याशी चर्चा केली. भारत आणि ताजिकिस्तान यांच्यातील ऐतिहासिक आणि सांस्कृतिक संबंध अधिक दृढ करण्यावर त्यांनी भर दिला. संरक्षण मंत्रालयानुसार, या बैठकीत स्टार्टअप्स, डिजिटल पब्लिक इन्फ्रास्ट्रक्चर आणि सांस्कृतिक देवाणघेवाणीच्या माध्यमातून सदस्य देशांमध्ये परस्पर सहकार्य मजबूत करण्यावर विचारमंथन करण्यात आले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news