

Trump Apple tariff iPhone production USA vs India
वॉशिंग्टन : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ॲपल कंपनीचे सीईओ टिम कुक यांना एक ठळक इशारा दिला आहे. त्यांनी म्हटले आहे की, अमेरिका मध्ये विकल्या जाणाऱ्या आयफोनचा उत्पादन स्थान अमेरिकेतच असायला हवे, भारतात किंवा इतर कुठल्याही देशात नाही.
जर ॲपलने भारतात आयफोन बनवले तर त्यांना किमान २५ टक्के टॅरिफ द्यावा लागेल, असा धमकीदायक इशारा त्यांनी दिला आहे.
ट्रम्प यांनी त्यांच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'ट्रूथ सोशल' वर पोस्ट करून म्हटले, "मी टिम कुक यांना आधीच सांगितले आहे की, अमेरिकेत विकल्या जाणाऱ्या आयफोनचे उत्पादन भारतात किंवा कुठल्याही दुसऱ्या देशात होऊ नये, तर त्यांना अमेरिकेला किमान 25 टक्के टॅरिफ भरावा लागेल."
या घोषणेनंतर ॲपलच्या शेअर्समध्ये प्रीमार्केट ट्रेडिंग दरम्यान 3 टक्क्यांहून अधिक घसरण झाली. यातून हे स्पष्ट होते की, ट्रम्प यांच्या या वक्तव्याने गुंतवणूकदारांमध्ये चिंता निर्माण झाली आहे.
ट्रम्प यांच्या या टॅरिफ धोरणामुळे ॲपलच्या भारतात आयफोन उत्पादन वाढवण्याच्या योजना अडचणीत आल्या आहेत. चीनवरील निर्भरता कमी करण्यासाठी ॲपल आपल्या आयफोन उत्पादनाचा एक मोठा भाग भारतात हलवण्याचा विचार करत आहे. मात्र ट्रम्प यांनी यावरून नाराजी व्यक्त केली आहे.
ट्रम्प यांनी मागील आठवड्यात मध्य पूर्वेतील देशांच्या दौर्यावर असताना देखील टिम कुक यांच्याशी बोलताना याबाबत असमाधान व्यक्त करत म्हटले होते की, “टिम कुक भारतात फार मोठ्या प्रमाणावर उत्पादन करत आहे. मला ते नको आहे. तुम्ही अमेरिकेतच उत्पादन करा.”
ॲपलची चीनवर अवलंबून असलेली उत्पादन व्यवस्था कोविड लॉकडाऊनमुळे प्रभावित झाली होती. त्यामुळे ॲपलने भारतात आयफोनचे उत्पादन वाढवण्याची योजना आखली आहे. सध्या भारतातील फॉक्सकॉन टेक्नॉलॉजी ग्रुप आणि टाटा समूहाच्या इलेक्ट्रॉनिक्स विभागाद्वारे आयफोनची निर्मिती केली जाते.
फॉक्सकॉन आणि टाटा समूह साउथ इंडियामध्ये नवीन उत्पादन केंद्रे उभारत आहेत आणि उत्पादन क्षमता वाढवत आहेत. गेल्या वर्षी भारतात ॲपलने अंदाजे 22 अब्ज डॉलर्सच्या आयफोन्सचे उत्पादन केले असून, मागील वर्षाच्या तुलनेत उत्पादनात जवळपास 60 टक्क्यांनी वाढ झाली आहे.
ट्रम्प यांच्या या टॅरिफ धोरणामुळे ॲपलला भारतातील उत्पादन थांबवावे लागेल की अमेरिकेत उत्पादन वाढवावे लागेल, हा प्रश्न उभा राहिला आहे. सध्या ॲपलचे अमेरिकेत स्मार्टफोनचे उत्पादन जवळपास नाही, त्यामुळे उत्पादन वाढवण्याचा निर्णय कंपनीसाठी मोठा आव्हान ठरू शकतो.
25 टक्के टॅरिफ भरावे लागेल असा इशारा दिल्याने आता ॲपलला आयफोनचे अमेरिकेत उत्पादन करावे लागेल असे दिसते. जे भारतासाठी चांगले चिन्ह नसेल.