पुढारी ऑनलाईन डेस्क : कॅनडा हा काही देश नाही ते तर अमेरिकेचे ५१वे राज्य आहे, असे विधान अमेरिकेचे नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे मागील काही दिवस सातत्याने करत आहेत. तसेच त्यांनी कॅनडाचे तत्कालीन पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांना अनेकवेळा अमेरिकन राज्याचे ५१ वे गव्हर्नर असेही संबोधले होते. आता त्यांनी थेट कॅनडाला अमेरिकेचाच एक भाग दर्शविणारा नकाशा साेशल मीडियावर शेअर केला आहे. ट्रम्प यांच्या भूमिकेवर आता पंतप्रधानपदाचा राजीनामा दिल्यानंतर जस्टिन ट्रुडो यांनी सोशल मीडिया फ्लॅटफॉर्म Xवर पोस्ट करत जोरदार प्रहार केला आहे. कॅनडाच्या परराष्ट्रमंत्र्यांनीही ट्रम्प यांना जोरदार प्रत्युत्तर दिले आहे.
डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक जिंकली. यानंतर कॅनडाचे तत्कालीन पंतप्रधान जस्टिन ट्रूडो त्यांना भेटण्यासाठी अमेरिकेत गेले होते. दोन्ही नेत्यांमध्ये बैठक झाली. या बैठकीचा फोटो ट्रम्प यांनी त्यांच्या ट्रुथ सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर शेअर केला होता. हा फोटो शेअर करताना ट्रम्प यांनी कॅनडा हे अमेरिकेचे ५१ वे राज्य आणि ट्रुडो हे अमेरिकन राज्याचे गव्हर्नर अशी कॅप्शन दिली होती. तसेच यानंतर ट्रम्प यांनी कॅनडाला अमेरिकेचाच एक भाग दर्शविणारा नकाशा ट्रुथ सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर शेअर केला आणि कॅप्शनमध्ये लिहिले, "अरे कॅनडा!". ट्रम्प सतत कॅनडाला अमेरिकेचे 51 वे राज्य म्हणून संबोधित करताना दिसत आहेत. ट्रम्प हे कॅनडाच्या स्वायत्तेलाच आव्हान देत असल्याने कॅनडाचे नेते भडकले आहेत.
अमेरिकेच्या अध्यक्षपदाची सूत्रे हाती घेणार असलेल्या डोनाल्ड ट्रम्प यांना जस्टिन ट्रुडो यांनी प्रथमच प्रत्युत्तर दिले आहे. जस्टिन ट्रुडो यांनी ट्विट केले की, 'कॅनडा अमेरिकेचा भाग होईल अशी कोणतीही शक्यता नाही. दोन्ही देशांचे कामगार आणि समुदाय हे एकमेकांचे सर्वात मोठे व्यापार आणि सुरक्षा भागीदार आहेत. याचा दोन्ही देशांना फायदा होतो.
ट्रुडो यांच्याशिवाय कॅनडाच्या परराष्ट्र मंत्री मेलानी जोली यांनीही ट्रम्प यांच्या विधानावर तिखट प्रतिक्रिया दिले आहे. जोली यांनी आपल्या X पोस्टमध्ये म्हटलं आहे की, "अमेरिकेचे निर्वाचित अध्यक्ष ट्रम्प यांच्या टिप्पण्यांवरून असे दिसून येते की, कॅनडा हा एक मजबूत देश कशामुळे होतो हे त्यांना पूर्णपणे समजलेले नाही. आमची अर्थव्यवस्था मजबूत आहे. आमचे लोक बलवान आहेत. धमक्यांना तोंड देऊन आम्ही कधीही मागे हटणार नाही."
या प्रकरणी कॅनडाचे विरोधी पक्षनेते पियरे पॉलीवेअर यांनी जाहीर केलेल्या निवेदनात म्हटलं आहे की, "आपण महान आणि स्वतंत्र देश आहोत. आम्ही अमेरिकेचे चांगले मित्र आहोत. अल-कायदाच्या 9/11 च्या हल्ल्यांना उत्तर देण्यासाठी अमेरिकन लोकांना मदत करण्यासाठी आम्ही अब्जावधी डॉलर्स आणि शेकडो जीव खर्च केले. आम्ही अमेरिकेला बाजारभावापेक्षा कमी किमतीत अब्जावधी डॉलर्सची उच्च दर्जाची आणि पूर्णपणे विश्वासार्ह ऊर्जा पुरवतो. आम्ही शेकडो अब्ज डॉलर्सच्या अमेरिकन वस्तू खरेदी करतो. आमचे कमकुवत सत्ताधारी NDP-लिबरल सरकार हे स्पष्ट मुद्दे मांडण्यात अपयशी ठरले आहे. मी कॅनडासाठी लढणार आहे. मी पंतप्रधान झाल्यावर, आम्ही आमच्या सैन्याची पुनर्बांधणी करू. कॅनडा आणि युनायटेड स्टेट्स दोन्ही सुरक्षित करण्यासाठी सीमेवरील नियंत्रण परत घेऊ. आम्ही कॅनडाला प्रथम स्थान देऊ."
कॅनडातील न्यू डेमोक्रेटिक पार्टीचे नेते, खलिस्तानी समर्थक खासदार जगमीत सिंग यानेही डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर हल्लाबोल केला आहे. त्याने म्हटलं आहे की, 'डोनाल्ड, तुमचा मूर्खपणा थांबवा. कोणताही कॅनेडियन तुमच्याशी संबंध ठेवू इच्छित नाही. आम्हाला कॅनेडियन असल्याचा अभिमान आहे. आम्ही ज्या प्रकारे आमच्या देशाचे रक्षण करतो त्याचा आम्हाला अभिमान आहे. तुम्ही कॅनेडियन लोकांच्या नोकऱ्या घेण्यासाठी आला आहात, अमेरिकन लोकांना किंमत मोजावी लागेल.
दोनच दिवसांपूर्वी जस्टिन ट्रूडो यांनी कॅनडाच्या पंतप्रधानपदाचा राजीनामा देण्याची घोषणा केली आहे. त्यांच्या या घोषणेनंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट केली. या पोस्टमध्ये ट्रम्प म्हणाले होते की, "कॅनडातील अनेकांना आपण अमेरिकेचे 51 वे राज्य व्हावे अशी इच्छा आहे. कॅनडाला आपली अर्थव्यवस्था सुरळीत ठेवण्यासाठी आवश्यक असलेली प्रचंड व्यापारी तूट आणि अनुदाने यापुढे अमेरिकेला परवडणार नाही. ट्रुडो यांना हे कळले आणि त्यांनी राजीनामा दिला."